Chhatrapati Sambhaji Nagar: कुठे उद्योजकांमध्ये चोरांची भीती तर कुठे नशेखोरांमुळे व्यापारी हैराण; संभाजीनगरात नेमकं चाललं काय?
Chhatrapati Sambhaji Nagar : नशेखोरांकडून विनाकारण व्यापाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीच्या निषेधार्थ रविवारी व्यापारी संघटनेने बंद पाळला.
Chhatrapati Sambhaji Nagar News : काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) उद्योजकांनी विशिष्ट खंडणीखोर नेत्यांमुळे आपण हैराण झालो असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याने मोठी खळबळ उडाली होती. अशात आता शहरातील व्यापारी नशेखोरांमुळे प्रचंड वैतागले आहेत. त्यामुळे नशेखोरांकडून विनाकारण व्यापाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीच्या निषेधार्थ रविवारी व्यापारी संघटनेने बंद पाळला. तसेच, गोंधळ घालणाऱ्या नशेखोरांवर कारवाई करा, अशी मागणी लावून धरली. शेवटी सिडको ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी घटनास्थळी जाऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर व्यवहार सुरळीत झाले. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांना झालेल्या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
अधिक माहिती अशी की, प्रफुल्ल राधाकिसन वाघचौरे (वय 25, नवजीवन कॉलनी, हडको) यांचे संजय गांधी मार्केटमध्ये विश्वकर्मा इलेक्ट्रिक नावाचे दुकान आहे. शनिवारी (8 जुलै) रोजी दुपारी तीन वाजता दुकान बंद करून ते जेवणासाठी निघाले असतानाच, आरोपी अक्षय सुरडकर व त्याच्या तीन ते चार साथीदारांनी वाघचौरे यांच्या हेल्मेटवर बुक्का मारून त्यांना खाली पाडले. सर्वांनी त्यांना बेदम मारहाण केली. प्रफुल यांचे काका बबन वाघचौरे हे त्यांच्या मदतीसाठी धावले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. या प्रकरणी वाघचौरे यांनी सिडको पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
मार्केटमधील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला
दरम्यान या घटनेनंतर रविवारी व्यापारी आक्रमक झाले. वाघचौरे यांना नशेखोरांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रविवारी सकाळी संजय गांधी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. तसेच, तेथे एकत्र येत या भागातील नशेखोरांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. व्यापारी आक्रमक झाल्यावर सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार हे घटनास्थळी गेले. त्यांनी या भागात दिवसा गस्त वाढवू, तसेच नशेखोरांवर कडक कारवाई करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतला.
चोरांच्या दहशतीमुळे उद्योजक हैराण...
एकीकडे नशेखोरांमुळे व्यापारी वैतागले असताना दुसरीकडे वाळूज भागातील उद्योजक चोरांच्या दहशतीमुळे हैराण आहेत. औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून, यामुळे उद्योजकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी मसिआच्या शिष्टमंडळाने शनिवारी (8 जुलै) रोजी वाळूज पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत आपल्या समस्यांचा पाढा वाचला. त्यामुळे शहरातील उद्योजक आणि व्यापारी यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: