Chhatrapati Sambhaji Nagar News: वाढत्या चोरीच्या घटनांनी संभाजीनगरातील उद्योजक हैराण, पोलिसांकडे मदतीची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar : लवकरच तोडगा काढून उपाययोजना करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले.
Chhatrapati Sambhaji Nagar News : ऑटो हब म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील उद्योजकांना मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याने औद्योगिक क्षेत्रात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी आपल्याला काही विशीष्ट नेत्यांकडून खंडणी मागत असल्याच्या तक्रारी उद्योजकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या होत्या. त्यातच आता वाळूज औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून यामुळे उद्योजकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी मसिआच्या शिष्टमंडळाने शनिवारी (8 जुलै) रोजी वाळूज पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत आपल्या समस्यांचा पाढा वाचला. यावेळी झालेल्या बैठकीत विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. यावर लवकरच तोडगा काढून उपाययोजना करण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या सर्व एमआयडीसीत वाळूज औद्योगिक वसाहतीचे विशेष महत्व आहे. बजाज सारखी मोठी कंपनी असल्याने त्यांना वेगवेगळे पार्ट पुरवणाऱ्या अनेक छोटे-मोठे कारखाने देखील आहे. त्यामुळे रात्री अपरात्री कामगारांना कंपनीतून कामावर आणि कामावरून घरी जावे लागते. यातील अनेक कामगार दुचाकी अथवा सायकलने प्रवास करत असतात. ही नेमकी संधी साधत क्षेत्रामध्ये सध्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेत कर्मचारी, कामगार यांना धमकावणे, त्यांच्याकडील पैसे, मोबाईल इत्यादी वस्तू हिसकावणे असे प्रमाण वाढले आहे. यामुळे हा सर्व कामगारवर्ग रात्रीच्यावेळी कंपनीत कामावर येण्यास धजत नाही. तर याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. यातून उद्योजकांसमोर संकट निर्माण होते. ही बाब मसिआच्या अध्यक्ष अनिल पाटील यांनी पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या निदर्शनास आणून दिली. मागील काही दिवसांपासून वाळूज एमआयडीसी परिसरात वाढत्या चोरीच्या प्रकारामुळे उद्योजक हैराण झाले आहेत. तर यावर लवकरात लवकर उपाययोजना करून त्या अंमलात आणाव्यात अशी विनंती मसिआच्यावतीने पोलिसांकडे करण्यात आली.
पोलिसांकडून मिळाले आश्वासन...
दरम्यान यावेळी झालेल्या बैठकीत पोलीस निरीक्षक बागवडे यांनी यावर उपाय म्हणून रात्रीच्यावेळी पोलिसांचे गस्तीच्या फेऱ्या वाढवल्या जातील असे सांगितले. तसेच उद्योजकांनी देखील सीसीटिव्ही बसवावे असे आवाहन केले. जेणेकरून गुन्हेगाराला ओळखणे आणि पकडणे सोईचे होईल. शिवाय पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती कारवाई केली जाईल असे सांगून लवकरात लवकर शक्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
इतर महत्वाच्या बातम्या :
Aurangabad City Name : औरंगाबाद नावात तूर्तास कोणताही बदल न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश