Aurangabad : 'आदर्श बँक घोटाळा' गाजत असतानाच अजिंठा अर्बन बँकेवरही RBI चे निर्बंध; ग्राहकांची बँकेत गर्दी
Aurangabad : आज सकाळपासून ग्राहकांनी बँकेत गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात घोटाळा आदर्श को. ऑपरेटिव्ह पतसंस्थेतील अंदाजे दोनशे कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा समोर आला असतानाच, आता शहरातील आणखी एका सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध घालण्याचे आदेश जारी केले. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, आज सकाळपासून ग्राहकांनी बँकेत गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक असे या बँकेचे नाव आहे.
औरंगाबाद शहरातील जुना मोंढा येथील जाधवमंडी परिसरात असलेल्या अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध घालण्याचे आदेश जारी केले आहेत. ज्यात आरबीआयच्या प्रसिद्धिपत्रकानुसार सध्या या बँकेला नवीन कर्जवितरण करण्यासह अग्रिमांचे नूतनीकरण, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक आणि नवीन ठेवी स्वीकरता येणार नाहीत. सहा महिन्यांसाठी हे निर्बंध असतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र, बँकेच्या संचालक मंडळातून या आदेशाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मंगळवारी आरबीआयने शहरातील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई करीत, संपूर्ण व्यवहारावरच निर्बंध घातले आहेत. आरबीआयने मंगळवारी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले. त्यात आरबीआयच्या मंजुरीशिवाय या बँकेला कर्जाचे वितरण, अग्रिम यांस नूतनीकरण आणि कोणतीही गुंतवणूक आणि व्यवहार हे करता येणार नाहीत. त्यामुळे या बँकांच्या हजारो ठेवीदार खातेदारांचे लाखो रुपये बँकेत अडकले आहेत. ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण असून, आपला पैसा परत मिळेल का नाही मिळेल तर कधी, असे प्रश्न ठेवीदारांपुढे निर्माण झाले आहेत. तर, आम्ही कोणाचेही पैसे बुडवलेले नाहीत आणि बुडणारही नाहीत. तर कोणतीही नोटीस न देताच कारवाई झाल्याने आश्चर्य वाटत असल्याचं अजिंठा अर्बनचे अध्यक्ष सुभाष झांबड यांनी म्हटले आहे.
"आदर्शनंतर आता अजिंठा अर्बन..."
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरातील आदर्श नागरी सहकारी बँकेत घोटाळा झाल्याचे समोर आले. उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या लेखापरीक्षणात औरंगाबादच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत नियमबाह्य कर्जवाटप करण्यात आल्याचे समोर आले होते. ज्यात ओळखीतल्याच लोकांना, स्वतःच्याच इतर संस्थांना कोट्यवधींच्या कर्जाची खैरात वाटल्याचे देखील तपासातून समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात शहरातील सिडको पोलीस ठाण्यात मुख्य संचालक अंबादास आबाजी मानकापेसह अन्य मंडळ, कर्जदारांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता शहरातील आणखी एका मोठ्या सहकारी बँकेवर निर्बंध आल्याने खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Adarsh Scam : आदर्श घोटाळ्याचा दुसरा बळी, पैसे बुडण्याच्या धास्तीने ठेवीदाराचा तणावातून मृत्यू