ABP Majha Impact : टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी सोडलं ते आलिशान हॉटेल आणि तामझाम; शिंदेंचा मुक्काम आता फाईव्ह स्टार हॉटेलमधून शासकीय विश्रामगृहात
Marathwada Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळासाठी संभाजीनगरमधील वेगवेगळ्या हॉटेलमधील 140 आलिशान रूम बुक करण्यात आल्या होत्या.
Marathwada Cabinet Meeting : एबीपी माझाच्या बातमीनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा मुक्काम आता फाईव स्टार हॉटेलमधून शासकीय विश्रामगृहात हलवला . कालपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे संभाजीनगरमधील रामा हॉटेलच्या आलिशान सूटमध्ये राहणार होते. पण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहणं मुख्यमंत्र्यांनी टाळल्याची माहिती समोर आली आहे. संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची एक विशेष बैठक (Sambhajinagar Cabinet Meeting) होणार असून त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळच त्या ठिकाणी पोहोचलं आहे.
एका दिवसाचे भाडे 32 हजार रुपये
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या (Marthwada Mukti Din) पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे. मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यामध्ये काही महत्त्वाचं निर्णय होणार असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि प्रशासन संभाजीनगरमध्ये आलं आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मुक्कामासाठी फाईव्ह स्टार हॉटेलमधील सूट बुक करण्यात आला होता. हॉटेल रामामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे हे 32 हजार रुपये इतकं आहे.
मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सोबत येणाऱ्या सर्व सचिवांची सोय ही ताज हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी या हॉटेलचे 40 रूम बुक करण्यात आले आहेत. तसेच अमरप्रित हॉटेलमध्ये 70 रुम बुक करण्यात आली आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत 1 हजार ते दीड हजार असणार आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या तामझामासाठी 300 गाड्या बुक करण्यात आल्या आहेत.
विरोधकांच्या टीकेनंतर निर्णय मागे
मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला असताना, शेतकरी संकटात असताना मंत्र्यांच्या मुक्कामासाठी आणि तामझामसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे विरोधकांनी चांगलीच टीका केली. एबीपी माझानेही यासंबंधित बातमी प्रसारित केली होती. या बातमीनंतर आणि विरोधकांच्या टीकेनंतर आता मुख्यमंत्र्यांनी आपला मुक्काम हा फाईव्ह स्टार हॉटेलमधून शासकीय विश्रामगृहात हलवला आहे.
यापूर्वीचा इतिहास पाहिला तर तत्कालीन मुख्यंमत्री मनोहर जोशी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी विश्रामगृहातच राहण्याची परंपरा निर्माण केली होती. पण यंदा चित्र वेगळं असण्याची शक्यता निर्माण झाली होती. विरोधकांच्या टीकेनंतर का असेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची ही परंपरा कायम ठेवली.
ही बातमी वाचा:
























