Chandrapur News : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर ताडोबाच्या प्रेमात; वर्षभरात तिसऱ्यांदा दिली व्याघ्र प्रकल्पाला भेट
Chandrapur News : सचिन तेंडुलकरला ताडोबाची चांगलीच भुरळ पडली आहे. गेल्या वर्षभरात सचिनने ताडोबात तिसऱ्यांदा ताडोबाला भेट दिली आहे. यंदा देखील तो आपल्या पत्नी आणि मित्रांसोबत ताडोब्यात दाखल झाला आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची (Tadoba Andhari Tiger Reserve) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) चांगलीच भुरळ पडली असल्याचे दिसत आहे. त्यामागील कारण असे की, गेल्या वर्षभरात सचिनने ताडोब्यात तिसऱ्यांदा येत जंगल सफारीचा आनंद घेतला आहे. त्यानंतर आता सचिन पुन्हा एकदा व्याघ्र दर्शनासाठी ताडोब्यात दाखल झाला आहे. यंदा देखील त्याने आपल्या पत्नी डॉ. अंजली आणि मित्रांसोबत जंगल सफारीचा 3 दिवस मनमुराद आनंद घेतला. पहिल्याच सफारीत कोलाराचे विशेष आकर्षण असलेले तारा, बबली, बिजली आणि युवराजने सचिनला दर्शन दिले. क्रिकेट विश्वातील देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरने वर्षभरात तिसऱ्यांदा ताडोब्याला भेट देऊन सहाव्यांदा जंगल सफारी केली आहे.
या वर्षातली सचिनची तिसरी ताडोबावारी
गुरुवारी दुपारी पत्नी डॉ.अंजली आणि काही मित्रांसोबत सचिन तेंडुलकर ताडोब्यात दाखल झाला. पहिल्याच सफारीत कोलाराचे विशेष आकर्षण असलेले तारा, बबली, बिजली आणि युवराजने सचिनला दर्शन दिले. विशेष म्हणजे सचिनला बबली आणि बिजलीचे बछड्यासह दर्शन झाले. तारा, बबली, बिजली आणि युवराजच्या दर्शनाने ते सारेच भारावले. तर शुक्रवारी सकाळी आणि दुपारी अलीझंझा गेटमधून त्याने परिवारासह सफारी केली. सचिन तेंडुलकर आतापर्यंत सहावेळा ताडोबात आला असून 2023 या वर्षातील त्याची ही तिसरी ताडोबावारी आहे. यावर्षी सचिनने फेब्रुवारी महिन्यात पहिली वारी केली, त्यानंतर मे महिन्यात दुसरी, तर आता डिसेंबर महिन्यात सचिन तेंडुलकरची ताडोब्यातील ही तिसरी वेळ ठरली आहे.
सचिन ताडोब्याची क्वीन मायाच्या प्रेमात
चिमूर तालुक्यातील एका खासगी रिसॉर्टमध्ये सचिन आपल्या पत्नी डॉ. अंजली आणि काही मित्रांसोबत मुक्कामी आहे. मागील तीन दिवसांपासून तो येथे मुक्कामी असून ताडोब्यात येण्याची त्याची ही सहावी वेळ आहे. सचिनने गुरुवारी दुपारी आल्याआल्या कोलारा गेटमधून ताडोबाच्या कोर झोनमध्ये सफारी केली. या सफारीत सचिनला नवेगाव परिसरात बबली वाघिणीचं बछड्यांसह बिजली वाघिणीचं दर्शन झालं. तर शुक्रवारी सकाळी आणि दुपारी अलिझंजा गेटमधून त्याने परिवारासह सफारी केली. विशेष बाब म्हणजे सचिनला माया वाघिणीचे विशेष आकर्षण आहे. परंतु यावेळी सचिनला माया वाघिण दिसली नाही. माया वाघिणीचा निमढेला, अलिझंजा आणि नवेगाव क्षेत्रात अधिवास होता. त्यामुळे प्रत्येकवेळी ती सचिनला दर्शन द्यायची. मायाचे दर्शन झाल्याशिवाय सचिनची पर्यटन सफारी अपूर्ण असायची. पण यावेळी मात्र मायाचे दर्शन न घेताच सचिनला परतावे लागणार आहे. कारण गेल्या काही महिन्यापासून माया ताडोब्यात दिसेनाशी झाली आहे. ताडोब्याची क्वीन असलेली माया वाघिणीच्या आता केवळ आठवणी उरल्या असल्याने सचिनचा काहीअंशी हिरमोड झाला.