नागरिकांना OYOचा मनस्ताप, चंद्रपुरात एकट्या बायपासवर 14 अनधिकृत हॉटेल्स! OYO बंद करण्यासाठी आमदारांचाही ग्रीन सिग्नल
Chandrapur: चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास रोड आणि इतर भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ओयो हॉटेल्सची संख्या झपाट्याने वाढली आहे.
Chandrapur News: गेल्या काही महिन्यात चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास रोड आणि इतर भागात ओयो हॉटेलचे पेव फुटले आहे. प्रेमी युगुलांना योग्य हॉटेल्स स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी सध्या ही हॉटेल्स बदनाम झाली आहेत. एकट्या बल्लारपूर बायपास मार्गावर ओयो लिहिलेली 14 पेक्षा जास्त हॉटेल्स आहेत. शासनाची, मनपाची किंवा OYO ची परवानगी न घेता हे हॉटेल्स सर्रासपणे अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन देत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. याविरोधात ओयो हटवा मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी चक्क एका हॉटेल समोरच काही दिवसांपूर्वी भजन आंदोलन देखील केले होते. आता या ओयो हटाव मोहिमेला आमदारानंही ग्रीन सिग्नल दिलाय. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी देखील चौकशी करून अनाधिकृत हॉटेल्स हटवा अशी मागणी प्रशासनाला केली आहे. यामुळे समाज स्वास्थ बिघडेल व मुली फसविल्या जातील असेही जोरगेवारांनी स्पष्ट केले आहे. आता या महत्त्वाच्या मुद्यावर शासन काय भूमिका घेते याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास रोड आणि इतर भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ओयो हॉटेल्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. या हॉटेल्सवर स्थानिक नागरिकांनी अश्लील वर्तनाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला असून, प्रेमी युगुलांना स्वस्त दरात सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली या हॉटेल्सची बदनामी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
अनधिकृत हॉटेल्सची भरमार
बल्लारपूर बायपास मार्गावर ओयोच्या नावाने चालवली जाणारी 14 पेक्षा जास्त हॉटेल्स अनधिकृतपणे सुरू असल्याचं स्थानिकांनी उघड केलं आहे. या हॉटेल्ससाठी शासन, मनपा किंवा ओयोकडून अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे हॉटेल्स नियमबाह्यपणे चालवले जात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
भजन आंदोलनानंतर मागणी तीव्र
या प्रकाराविरोधात परिसरातील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी एका हॉटेलसमोर भजन आंदोलन केलं होतं. यामुळे या मुद्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. नागरिकांच्या या संतप्त भावना लक्षात घेऊन चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनीही यामध्ये हस्तक्षेप करत प्रशासनाला अनधिकृत हॉटेल्सवर चौकशी करून तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. "हे हॉटेल्स समाजातील विकृतीला प्रोत्साहन देत आहेत. आम्ही अशा गोष्टींना थारा देणार नाही." अशी नागरिकांची प्रतिक्रीया असून त्यावर " अनधिकृत हॉटेल्सची चौकशी करून ही हॉटेल्स तातडीने बंद करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.