(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrapur News : खडतर प्रवास अखेर यशस्वी, चंद्रपुरात महिलेने दिला जुळ्या बाळांना जन्म
Chandrapur News : प्रसव कळा सुरू झाल्यानंतर महिलेला रूग्णालयात दाखल करण्यास खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु प्रथम रेल्वे आणि नंतर अॅम्बुलेन्सच्या मदतीने महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले.
Chandrapur News Update : चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेनेच्या सतर्कतेमुळे महिलेची गुंतागुंतीची प्रसूती यशस्वी झाली आहे. या महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. महिलेसह दोन्ही बाळांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मुसळधार पावसामुळे प्रसव कळा सुरू झाल्यानंतर महिलेला रूग्णालयात दाखल करण्यास खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु प्रथम रेल्वे आणि नंतर रूग्णवाहिकेच्या मदतीने महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि प्रसूती यशस्वी झाली.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. प्रमुख मार्ग जलमय झाल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदाफाटा गावात रजनी तलांडे या महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्या. स्थानिक वाहनातून तिला तातडीने आशासेविकेच्या मदतीने गडचांदूर येथील शासकीय रुग्णालयात दाखर करण्यात आले. परंतु, गुंतागुंत आढळल्याने तिला चंद्रपूर येथे पाठवण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला.
वर्धा नदीला पूर आल्यामुळे राजुरा-चंद्रपूर हा मार्ग बंद आहे. त्यामुळे सोबतच्या आशा सेविकेने तिला जवळच्या माणिकगड-चुनाळा रेल्वेस्थानकावर आणले. रजनीला बल्लारपूरपर्यंत रेल्वेच्या बोगी मधील शौचालयाच्या बाजूला बसून प्रवास करावा लागला. आशासेविकेने तिला पुन्हा बल्लारपूर येथील रुग्णालयात दाखल केले. तेथून रुग्णवाहिकेतून चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रसूती शस्त्रक्रिया केली आणि रजनीने मुलगा आणि मुलगी अशा जुळ्या बाळांना जन्म दिला.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे राज्यातील काही नद्या इशारा पातळीच्या वर तर काही नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. अनेक नद्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. परंतु, असाच खडतर प्रवास करत रजनी यांना रुग्णालय गाठावे लागले आहे. अखेर आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे ती रूग्णालयात पोहोचली आणि तिने जुळ्या बाळांना जन्म दिला.