(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrapur Crime : प्रेमाला नकार दिल्याने 19 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर पेट्रोल टाकलं, मुलीने प्रतिकार केल्याने अनर्थ टळला
Chandrapur Crime : प्रेमाला नकार दिल्याने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाने पेट्रोल टाकल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात समोर आली. मुलीने प्रतिकार केल्याने आरोपीने पळ काढला आणि मुलगी बचावली
Chandrapur Crime : प्रेमाला नकार दिल्याने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाने पेट्रोल (Petrol) टाकल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात (Chandrapur) समोर आली. मुलीने प्रतिकार केल्याने आरोपीने पळ काढला आणि मुलगी बचावली. भद्रावती तालुक्यातील बेलगाव इथे सोमवारी (12 जून) संध्याकाळी ही घटना घडली.
काय आहे प्रकरण?
एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) आरोपीने हे कृत्य केल्याचं समजतं. आरोपी तरुण आणि अल्पवयीन मुलगी एकाच परिसरात राहतात. आरोपीचे संबंधित अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. परंतु मुलीने त्याच्या प्रेमाला नकार दिल्याने आरोपी संतापला. रागाच्या भरात त्याने मुलीला जीवे मारण्याचं ठरवलं. ही मुलगी सोमवारी संध्याकाळी घरात एकटी असल्याचं आरोपीला समजलं. त्याने मुलीच्या घरात प्रवेश केला आणि तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं. मात्र मुलीने प्रतिक्रार केल्याने आरोपीने तिथून पळ काढला आणि पुढील अनर्थ टळला.
आरोपीवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
हा सगळा प्रकार मुलीने आपल्या कुटुंबियांना सांगितला. यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणी भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी सिद्धांत भेले या तरुणावर काल (13 जून) रात्री भादंवि कलम 307 अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.
आरोपी आयटीआयचा विद्यार्थी
आरोपी तरुण देखील बेलगावचाच रहिवासी आहे. आरोपी आयटीआयचा विद्यार्थी असून चंद्रपूर इथे शिक्षण घेत आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला, अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
चंद्रपुरात सप्टेंबर 2021 मध्ये एकतर्फी प्रेमातून 17 वर्षीय मुलीवर चाकूहल्ला करण्यात आला होता. महाकाली मंदिर परिसरात तरुणाने तिच्यावर हल्ला केला होता. चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिचा नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडित तरुणी खाजगी रुग्णालयात काम करायची. आरोपीने 1 सप्टेंबरला त्या रुग्णालयात जाऊन मुलीला शिवीगाळ केली होती आणि याबाबत रामनगर पोलीस स्टेशनला गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता. याचा राग आरोपीच्या मनात होता. त्यानंतर काही दिवसांनी तरुणी हॉस्पिटलमधील आपलं काम संपवून घरी जात होती. मात्र तिच्या वाटेत दबा धरुन बसलेल्या आरोपीने तिच्यावर चाकूचे सपासप वार केले आणि या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हेही वाचा