(Source: Poll of Polls)
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील भगदाड 'जैसे थे', मात्र MSRDC कडून लोकांची दिशाभूल
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर भगदाड पडलं नसून पुलाचा इंटरलॉकिंग जॉईंट दुरुस्त करण्याचं काम सुरू असल्याचं MSRDC ने सांगितलं होतं. पण पुलावर तसं कुठेही दिसत नाही.
बुलढाणा : समृद्धी महामार्गावर चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित होत आहे. मंगळवारी सकाळी समृद्धी महामार्गावरील चेनेज 332.6 वरील पूलावर मोठं भगदाड पडल्याचं दिसून आलं. गेल्या दोन आठवड्यापासून या पुलावरील दोन मार्गिका बंद करून वाहतूक एकाच मार्गिकेवर धोकादायक पद्धतीने वळवण्यात आल्याची बातमी 'एबीपी माझा'ने दाखवली होती. त्यानंतर समृद्धी महामार्ग प्रशासनाने (MSRDC) पत्रक काढून खुलासा केला आहे.
या पत्रकात समृद्धी महामार्ग प्रशासनाने असं म्हटलं आहे की, समृद्धी महामार्गावर कुठेही भगदाड पडलेलं नसून पुलाचा इंटरलॉकिंग जॉईंट दुरुस्त करण्याचं काम सुरू असल्याचा खुलासा त्यांनी केला. सोबत एक फोटो शेअर करून हे काम पूर्ण झालं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मात्र मंगळवारी रात्री आठ वाजता 'एबीपी माझा'ने पुलावरील कामाचा रियालिटी चेक केले असता या पुलावर कुठेही भगदाड बुजवल्याचं दिसून आलं नाही. पुलावरील दोन्ही मार्गिका बंदच असून एका मार्गिकेवरून वाहतूक सुरू असल्याचं दिसतंय. ही वाहतूक धोकादायक असून या ठिकाणी केव्हाही भरधाव वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमएसआरडीसीकडून करण्यात आलेल्या खुलाशावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. खुलासा करून काम पूर्ण झाल्याचं MSRDC ने म्हटलं आहे. पण हा नागरिकांच्या आणि वाहनचालकांच्या जीवाशी खेळ नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
एबीपी माझा ने MSRDC चे PRO तुषार अहिरे यांच्याशी या खुलाशाबद्दल फोनवरून माहिती घेतली. ते म्हणाले की, "मला अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानुसार तो फोटो शेअर करण्यात आला. मला वेळ द्या. मी अजून सत्यता तपासून बघतो."
20 वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा पहिल्या वर्षातच फेल
तब्बल 55 हजार कोटी रूपये खर्चून मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग बांधण्यात आला. महामार्ग वाहतुकीला खुला करून अवघं एक वर्ष झालं, तोच या महामार्गाला मोठमोठाले तडे, भेगा पडल्याचं दिसतंय. त्यातच समृद्धी महामार्ग हा काही साधासुधा महामार्गही नाही. या ठिकाणी गाड्या सुपरफास्ट वेगाने धावतात. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजजवळ 3 सेमी रुंद आणि 50 फूट लांबीच्या भेगा पडल्या समोर आले होतं. महामार्गासाठी एम-40 ग्रेडचं सिमेंट वापरल्यास 20 वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा एमएसआरडीसीने केला होता, पण तो आता फोल ठरला आहे. माळीवाडा इंटरचेंजजवळच पुलावर असा खड्डा पडला असून कधीही अपघात होईल अशी शक्यता आहे. समृद्धी महामार्गावरची ही भयानक अवस्था, पुलावरील रस्त्याची अवस्थाही वेगळी नाही. या ठिकाणच्या पुलावर खड्डे पडलेत. एखादं मोठं वाहन तिथून गेलं तर संपूर्ण रस्ता हलतो. पुलावरील या खड्ड्यामुळे भरधाव वाहनाचा अपघात होण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा :