Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरवर मोठं भगदाड; सरकारी यंत्रणेचं दुर्लक्ष, मृत्यूला आवताण
Samruddhi Mahamarg: 20 वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा पहिल्या वर्षातच फेल
बुलढाणा: नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सुरू होऊन जेमतेम एक वर्ष उलटलं आहे. मात्र या महामार्गाच्या कामाचा दर्जा आता समोर येत आहे. अनेक ठिकाणी कुठे खड्डे पडले आहेत, तर कुठे भेगा पडल्या आहेत. समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरवरील चॅलेंज 332.6 वरील दोन डोंगरांना जोडणाऱ्या मोठ्या पूलाला गेल्या 15 दिवसापासून मोठ भगदाड पडलं आहे. जवळपास दोन आठवडे उलटूनही समृद्धी महामार्ग प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
समृद्धी महामार्ग प्रशासनाला भगदाड पडल्याचे लक्षात आल्यावर प्रशासनाने मुंबईकडे जाणाऱ्या पंधरा दिवसापासून या पुलावरील दोन लेन बंद केल्या असून फक्त एकच लेन सुरू आहे. त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहन चालकाला समोर पुलावर एकच लेन सुरू आहे. हे दिसत नसल्याने दररोज अनेक अपघात टाळत आहे. भरधाव येणाऱ्या वाहन चालक हा गोंधळून जात असल्याने या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता आहे . मात्र तरीही समृद्धी महामार्ग गेल्या दोन आठवड्यापासून सुस्त बसलेलं आहे.
दिवसेंदिवस हे भगदाड मोठे होत आहे. मुंबई कॉरिडोर वरील 332. 6 वरील याच पुलाचे बांधकाम सुरू असताना भला मोठा गर्डर कोसळून अनेक कामगार जखमी झाले होते. आता त्याच पुलाला मोठे भगदाड पडल्याने समृद्धीच्या या पुलावर कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. काल रात्री असाच एक अपघात या ठिकाणी टळला. भरधाव येणाऱ्या ट्रक चालकाला समृद्धीवरील या दोन लेन बंद असून एकच लेन सुरू असल्याचा दिसलं नसल्याने सरळ हा ट्रक एका खाजगी बसला धडकला. मात्र यात कुठलेही नुकसान झालं नसलं तरी मोठ्या अपघाताची शक्यता या ठिकाणी बळावली आहे.
20 वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा पहिल्या वर्षातच फेल
तब्बल 55 हजार कोटी रूपये खर्चून मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग बांधण्यात आला. महामार्ग वाहतुकीला खुला करून अवघं एक वर्ष झालं, तोच या महामार्गाला मोठमोठाले तडे, भेगा पडल्याचं दिसतंय. त्यातच समृद्धी महामार्ग हा काही साधासुधा महामार्गही नाही. या ठिकाणी गाड्या सुपरफास्ट वेगाने धावतात. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजजवळ 3 सेमी रुंद आणि 50 फूट लांबीच्या भेगा पडल्या समोर आले होतं. महामार्गासाठी एम-40 ग्रेडचं सिमेंट वापरल्यास 20 वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा एमएसआरडीसीने केला होता, पण तो आता फोल ठरला आहे. माळीवाडा इंटरचेंजजवळच पुलावर असा खड्डा पडला असून कधीही अपघात होईल अशी शक्यता आहे. समृद्धी महामार्गावरची ही भयानक अवस्था, पुलावरील रस्त्याची अवस्थाही वेगळी नाही. या ठिकाणच्या पुलावर खड्डे पडलेत. एखादं मोठं वाहन तिथून गेलं तर संपूर्ण रस्ता हलतो. पुलावरील या खड्ड्यामुळे भरधाव वाहनाचा अपघात होण्याची शक्यता आहे.