Ravikant Tupkar : शेतकऱ्यांशी अर्वाच्च भाषेत बोलत असाल तर धडा शिकवणारच; रविकांत तुपकरांचा तानाजी सावंतांना इशारा
Ravikant Tupkar on Tanaji Sawant : सुपारी घेऊन कार्यक्रमात उभे राहून बोलायचं नाही, औकातीत राहून बोलायचे, अशी दमबाजी तानाजी सावंत यांनी शेतकऱ्याला केली होती.
बुलढाणा : आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना एका शेतकऱ्याने (Farmer) प्रश्न विचारताच त्यांनी शेतकऱ्याची औकातच काढली. सुपारी घेऊन कार्यक्रमात उभे राहून बोलायचं नाही, औकातीत राहून बोलायचे. औकातीत राहून विकास करून घ्यायचा, आम्ही उडत्याचे मोजतो, अशी दमबाजी तानाजी सावंत यांनी शेतकऱ्याला केली. आता यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी तानाजी सावंत यांना थेट इशाराच दिला आहे.
अर्वाच्च भाषेत बोलत असाल तर धडा शिकवणारच
रविकांत तुपकर म्हणाले की, हे अतिशय दुर्दैवी आहे. सत्तेतील लोकांनी अतिशय विनम्र राहायला हवे. सरकारच्या भरवशावर तुम्ही जिवंत आहात. शेतकऱ्यावर जर कोणी दादागिरी करत असेल, अर्वाच्च भाषेत बोलत असेल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. आम्ही त्या नेत्याला धडा शिकविणार आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी अॅट्रॉसिटी सारखा कायदा आणला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
नेमकं काय म्हणाले होते तानाजी सावंत?
डोंगरवाडी गावात पालकमंत्री तानाजी सावंत यांचा गाव संवाद दौरा सुरु होता. यावेळी तानाजी सावंत गावामध्ये बंधाऱ्याच्या कामाविषयी सांगत होते. गावकऱ्यांनी बंधाऱ्यास गेट बसवून प्रश्न मिटणार नाहीत, असे म्हणताच तानाजी सावंत गावकऱ्यांवर संतापले. खाली बसा आपण विकासाचे बोलायला आलो आहोत. मी इंजीनियर आहे टेक्निकल आहे. एखाद्याची सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही. आम्हालाही कळत कोणाची तरी सुपारी घ्यायची उभा राहून बोलायचं आणि चांगल्या कामात मिठाच्या खडा टाकायचा आम्हीही उडत्याची मोजतो आपापल्या औकातीत राहून बोलायचं, औकातीत राहून विकास करायचा, असे म्हणत तानाजी सावंत यांनी ग्रामस्थांना दम दिला होता.
...तर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करू
दरम्यान, सोयाबीन, कापूस आणि शेती पिकाला योग्य भाव मिळावा, 100 टक्के पिक विमा मिळावा, तसेच इतर मागण्या 3 सप्टेंबरपर्यंत मंजूर करा. अन्यथा 4 सप्टेंबरपासून सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्न त्याग आंदोलन करू, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या