(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बुलढाण्यात विषाणूजन्य आजारांची साथ; बदलत्या वातावरणामुळं सर्दी, ताप, डायरीयाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ
Maharashtra Buldhana News : बुलढाण्यात विषाणूजन्य आजारांची साथ. सर्दी, ताप, डायरीयाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ. शासकीय रुग्णालयाबाहेर लांबच लांब रांगा.
Maharashtra Buldhana News : राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस (Buldhana Rain) कोसळत आहे. सध्या पावसाच्या वातावरणामुळे हवेत गारवा वाढला आहे. हवामानातील बदलांमुळे अनेक पावसाळी आजारांनीही डोकं वर काढलं आहे. बुलढाण्यातही जिल्ह्यातही विषाणूजन्य आजारांची साथ आल्याचं पाहायला मिळत आहे.
गेल्या महिन्यात (जूनमध्ये) 60 ते 70 रुग्ण असताना आता या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात 10 पटीनं वाढ झाली असून असून शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील वातावरण पावसाळी आहे. तर गेल्या 48 तासांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस पडत असल्यानं वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला असून जिल्ह्यात विषाणूजन्य तापाची साथ सुरू झाली आहे. त्यामुळे प्रामुख्यानं खामगाव शहर आणि ग्रामीण भागांत मोठ्या संख्येनं ताप, खोकला सर्दी आणि डायरीयाचे रुग्ण वाढले आहेत. अनेक रुग्ण प्रथम गावातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत. परंतु, या उपचारांचा फारसा गुण येत नसल्यानं अनेक रुग्णांनी शासकीय रुग्णालयाबाहेर रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक घरामध्ये सर्दी, तापाचे रुग्ण दिसून येत आहेत. रुग्णांमध्ये प्रामुख्यानं बालक आणि वृद्धांचा मोठा समावेश आहे. खामगाव येथील बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. कारण सर्दी तापाच्या रुग्णांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून सातत्यानं वाढ होत आहे. दररोज 60 आणि 30 च्यावर असणारा आकडा 500 ते 700 वर पोहचला आहे. काही रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलसुद्धा करण्यात आलं आहे. यामध्ये डायरीया आणि तापाच्या रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागांतील मजूर वर्ग नदी, नाल्यातील पाणी पित असल्यामुळे त्यांना डायरीयाची लागण होत असल्याचा अंदाज शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांकडून व्यक्त केला जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :