Buldhana News : सरपंचाने गावकऱ्यांसमोर मांडला चक्क कमिशनचा हिशोब, महिला सरपंचाने दिला गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का
Buldhana News : सरपंच म्हणजे गावचा प्रथम नागरिक असतो. मात्र विविध कामाच्या माध्यमातून कमिशन घेत लाखोंचा मलिदा जमा करण्याचे पद म्हणजे सरपंच अशी प्रतिमा काही वर्षात निर्माण केली जात असून त्याच दृष्टीने सरपंच पदाकडे बघितलं जातय.
बुलढाणा : सरपंच म्हणून गावात होणाऱ्या प्रत्येक कामात सरपंचाचा वेगळं कमिशन ठरलेलं असतं. सरपंचाला कमिशन देणे हा पूर्वपार चालत आलेला एक अलिखित नियमच (Buldhana News) आहे. आणि त्यामुळे कमिशन घेणे हा सरपंचाचा हक्कच बनला आहे. वेळप्रसंगी कमिशनसाठी काम अडविणे , ठेकेदारांना वेठीस धरणे असेही प्रकार होतात . मात्र कोणत्या कामात किती कमिशन घेतले हे कुणीच कुणाला सांगत नाही हे सर्व गुलदस्त्यातच असतं परंतु आपण अडीच वर्षात किती कमिशन घेतल याचा हिशोबच एका सरपंचाने गावकऱ्यांसमोर मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सरपंच म्हणजे गावचा प्रथम नागरिक असतो. मात्र विविध कामाच्या माध्यमातून कमिशन घेत लाखोंचा मलिदा जमा करण्याचे पद म्हणजे " सरपंच " अशी प्रतिमा काही वर्षात निर्माण केली जात असून त्याच दृष्टीने सरपंच पदाकडे बघितलं जातय. त्यातच महिला सरपंच असल्यास संपूर्ण गावाचा कारभार पतीच्या हाती असतो आणि महिलाराज नव्हे तर पतीराज निर्माण होतं. परंतु याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जलंब हे गाव अपवाद ठरल आहे. या गावच्या सरपंच मंगलाताई खोपे यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात वेगवेगळ्या कामातून मिळालेल्या कमिशनचा चक्क हिशोबच गावकऱ्यांच्या समोर ठेवला आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
22, 77, 500 रुपयांचा मांडला हिशोब
मंगला घोपे या जरी सरपंच असल्या तरी आपल्या गावात विकास कामे करावीत अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षात या गावांमध्ये अडीच कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत. यातून सरपंचास रीतसर कमिशनही मिळालं. परंतु हा कमिशनचा पैसा स्वतःसाठी न ठेवता त्याचाही वापर गावातील विकास कामांसाठीच करून त्यांनी त्याची एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी गावात एक मोठा कार्यक्रम घेऊन संपूर्ण गावकऱ्यांसमोर कमिशनचा हिशोब मांडला आहे. या कामातून मिळालेल्या 22, 77, 500 कमिशन रुपयांचा हिशोब सर्व गावकऱ्यांसमोर या सरपंचाने मांडला. एवढच नाही तर अडीच वर्षात केलेली कामे सुद्धा त्याचे इस्टिमेट , मिळालेला निधी, झालेला खर्च आणि कमिशन यांचा संपूर्ण गोषवारा एका पुस्तकात नमूद करून हे पुस्तक गावकऱ्यांसमोर या महिला सरपंचांनी ठेवलं आणि त्यामुळे गावकरी अवाक झाले आहेत.
कमिशनचा गावकऱ्यांना हिशोब
महिला केवळ घराचा नव्हे तर संपूर्ण गावाचा कारभार देखील सांभाळू शकतात हे महिला सरपंच मंगला घोपे यांनी दाखवून दिल आहे. सर्वांना सोबत घेत गावात अडीच कोटी रुपयांची विकास कामे करून यातून मिळालेल्या कमिशनचाही गावकऱ्यांना हिशोब त्यांनी दिला आहे. आज प्रत्येक गावात असे सरपंच असणे आवश्यक आहे .त्यामुळे इतर गावातील सरपंचांनी हा आदर्श घ्यावा असं मंगला घोपे यांच्या पतींना वाटत आहे.