Buldhana News: धावत्या खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये तरुण मद्यपान करतानाचा व्हिडीओ व्हायरल, खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची सुरक्षा धोक्यात
Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या धावत्या ट्रॅव्हल्समध्ये मद्यपान करताना काही तरुणांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
बुलढाणा: बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 25 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना ताजी असतानाच बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या धावत्या ट्रॅव्हल्समध्ये मद्यपान करताना काही तरुणांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे खाजगी ट्रॅव्हल्सचा प्रवास कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
अकोला जिल्ह्यातील पातूर येथून पुण्यासाठी श्रेया ट्रॅव्हल्स ही नव्यानेच सुरू झाल्याची माहिती आहे. या ट्रॅव्हल्समध्ये खामगाव ते चिखली दरम्यान चालकाच्या बाजूला केबिनमध्येच बसून चालकाचे चार ते पाच मित्र धावत्या ट्रॅव्हल्स मध्ये मद्यपान करत असल्याचा व्हिडीओ एका प्रवाशाने आपल्या कॅमेरात कैद केले आहेत. तर चालक देखील मद्यपान केलेल्या स्थितीतच असल्याचा अंदाज काही प्रवाशांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा ट्रॅव्हल्स चालकासह मालकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
प्रवाशांच्या जीवाशी खेळ
हजारो प्रवाशांची ने-आण करणाऱ्या काही गाड्यांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांना हरताळ फासण्यात येत आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. आरटीओकडून घालण्यात आलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करत सर्रास क्षमतेपेक्षा अधिक मााणसांची ने- आण केली जाते. प्रत्येक ट्रॅव्हल्स बसमध्ये अग्निशमन यंत्रणा असावी. प्रत्येक ट्रॅव्हल्स बसमध्ये संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग असावा. गाडी सुटण्यापूर्वी याची माहिती प्रवाशांना देण्यात यावी. बसमधील इलेक्ट्रॉनिक उपकरणांची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नसावेत.
मागील काही दिवसात खासगी बसच्या दुर्घटनेत वाढ झाल्याचं चित्र आहे. अनेक नागरीक सोयीसाठी खासजी बसने प्रवास करतात. जास्तीचे भाडे देऊन प्रवास सुखकर होण्याकडे नागरिकांचा कल असतो. मात्र याच बसच्या दुर्घटनेत सध्या वाढ झाली आहे. खासगी बसचा प्रवास प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याचं चित्र आहे.
बुलढाण्याजवळ शनिवारी मध्यरात्री झालेला अपघात (Buldahana Bus Accident) हा समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात आहे. या बस अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बसमधील 32 प्रवाशांपैकी 8 जण सुदैवाने बचावले. मध्यरात्री दीड वाजता समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) पिंपळखुटा गावाजवळ बसचा अपघात झाला. बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली, त्यानंतर रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाली आणि बसने पेट घेतला. बसचा दरवाजा खालच्या बाजूला गेल्याने कोणालाही बाहेर येता आलं नाही. काही प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर आले.