Buldhana News : शिक्षक असूनही शाळेवर येत नसल्याने शाळा 14 दिवसांपासून बंद, बुलढाण्यातील शाळांचं विदारक वास्तव
Buldhana News : शाळेवर शिक्षक नेमणूक असूनही शाळेत शिक्षक येत नसल्याने बुलढाण्यातील आदिवासी भागातील शाळा गेल्या अनेक दिवसांपासून कुलूपबंद असल्याने या भागातील विद्यार्थ्यांचं भविष्य अंधरात असल्याचे भीषण वास्तव समोर आलंय.
बुलढाणा : देशाच्या राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजाच्या महिलेला विराजमान होण्याचा बहुमान मिळाला खरा...! मात्र बुलढाण्याच्या आदिवासी भागात मुलांना साधा शिक्षणाचा हक्क मिळत नाही. बुलढाण्यात शाळेवर शिक्षकांची नेमणूक असूनही शिक्षक येतच नसल्याने बुलढाण्याच्या आदिवासी भागातील शाळा गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. याआधी प्रशासनाने कशीबशी एका शिक्षकाची तात्पुरती नियुक्ती या शाळेवर केली होती.पण हे शिक्षक देखील या शाळेवर गेल्या 14 दिवसांपासून फिरकलेच नाहीत. शिक्षकच नाहीत म्हटल्यावर शाळा गेल्या 14 दिवसांपासून बंदच आहेत. त्यामुळे इथल्या 70 विद्यार्थ्याचं नुकसान झांलय.त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा कधी सुरु होणार याकडे लक्ष लागून आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी व मध्यप्रदेशच्या सीमेवर शिवणी गाव वसलेलं आहे. गावाची लोकसंख्या जेमतेम 1200 च्या घरात आहे. हा सर्व भाग म्हणजे आदिवासी लोकसंख्या बहुल असून आदिवासींच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चौथी शाळा आहे. शाळेत एकूण 70 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेवर बरोबर एक वर्षांपूर्वी शाळेतील दोन शिक्षकांनी शाळेतच मटण आणि दारू पार्टी केली होती, त्यामुळे त्या शिक्षकाने निलंबित करण्यात आलं होतं. तेव्हापासून या शाळेवर कायमस्वरूपी शिक्षकच नाही, प्रशासनाने कशीबशी एका शिक्षकाची तात्पुरती नियुक्ती या शाळेवर केली खरी पण हे शिक्षक या शाळेवर गेल्या 14 दिवसांपासून फिरकलेच नाही. त्यामुळे ही शाळा गेल्या 14 दिवसांपासून बंदच आहे. त्यामुळे येथील 70 विद्यार्थ्याचं भविष्य अंधकारमय झालं आहे. दररोज हे आदिवासी मुलं शिक्षण घेण्यासाठी शाळेत येतात तर शिक्षकही नाही आणि शाळेला कुलूप..... त्यामुळे हे आदिवासी मुलं डोंगरदऱ्यात , धरणावर दिवसभर फिरत असल्याचं वास्तव समोर आले आहे.
शाळेवर शिक्षक नेमणूक असूनही शाळेत शिक्षक येतच नसल्याने बुलढाण्यातील आदिवासी भागातील शाळा गेल्या अनेक दिवसांपासून कुलूपबंद असल्याने या भागातील विद्यार्थ्यांचं भविष्य अंधरात असल्याचे भीषण वास्तव समोर आलंय. दोन वर्षे कोरोनामुळे शाळा बंद होत्या. आदिवासी भागात ऑनलाइन शिक्षण नव्हते आणि आता शाळा सुरू होऊन जेमतेम एक महिनाच झालाय पण बुलढाण्यातील आदिवासी भागातील शाळेत शिक्षकांची नेमणूक असूनही शिक्षक शाळेत येतच नसल्याने या विद्यार्थ्यांचं भविष्य काय..? असा सवाल करत शिवनी या गावातील आदिवासी विध्यार्थ्यानी आपल्या पालकासोबत शाळेसमोरच ठिय्या दिला आहे. राजकारणी आपल्या राजकारणात आहेत , राज्याला शिक्षण मंत्री नाही....त्यामुळे कदाचित प्रशासन अनेकदा तक्रारी करूनही या आदिवासींच्या समस्याच ऐकूण घेत नसल्याने आता या विद्यार्थ्यांना आंदोलन सुरू करावं लागलं आहे.
याबाबत जिल्ह्याचे शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही विचारणा केली असता सुरुवातीला ते या बाबतीत अनभिज्ञ होते. त्यांनी संबंधित तालुक्याच्या प्रशासनाला याबाबत विचारणा करून सविस्तर माहिती घेतली असता त्यांनी याबाबत तात्काळ याबाबत संबंधित शिक्षकावर चौकशी करून कारवाई करण्याचं सांगितलं.