बुलढाण्यातील या गावात लग्नासाठी मुली देत नाहीत, रस्ताच नसल्याने गरोदर महिला आणि शाळकऱ्यांचा जीवघेणा प्रवास
Buldhana : या गावातील गरोदर महिलांना रुग्णालयात जाण्यासाठी खाटेवरून तर शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय.
बुलढाणा: जिल्ह्यात असं एक गाव आहे ज्या ठिकाणी लग्नासाठी कुणीही मुलगी देत नाही. त्यामुळे या गावातील असंख्य मुलं लग्नाविनाच आहेत. तर या गावातील महिलांना प्रसुतीसाठी किंवा रुग्णालयात जायचं असेल तर त्यांना खाटेवरून प्रवास करावा लागतो. इतकंच काय तर शाळकरी मुलांना तर चक्क चिखल तुडवत, रेल्वे लाईनवरून चालत जाऊन जीवघेणा प्रवास करून शाळा गाठावी लागते. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा या गावातील गावकऱ्यांना हाल अपेक्षांचा सामना करावा लागतो.
या ठिकाणच्या गरोदर महिलांना खाटेवरुन रुग्णालयात घेऊन जाव लागतं, कारण या गावात रस्ताच नाही. या गावातील शाळकरी मुलांना दररोज एकफळ गावातून दोन किलोमीटर रेल्वे रुळावरून प्रवास करावा लागतोय आणि चालत आळसना हे गाव गाठावं लागतं. तिथून ही मुलं मग एसटीने शेगावला शाळेत पोहोचतात. हा यांचा नित्याचा प्रवास. पण तुम्ही म्हणाल हे असं का? तर स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा या गावाला रस्ताच झाला नाही आणि हो या गावाला शाप मिळालाय तो या गावाच्या बाजूने जाणाऱ्या रेल्वे लाईनमुळे. या गावाच्या बाजूने मुंबई-कोलकाता मार्गाची मध्य रेल्वेची मुख्य लाईन गेलेली आहे. त्यामुळे या गावाला रस्ता बनवण्यात अडचणी निर्माण होत आहेत. अनेकांनी रस्त्यासाठी जमिनीचे दानपत्र दिलं खरं पण प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे या गावाचा रस्ता चिखलात आहे की चिखलात रस्ता आहे हे कळतच नाही. पावसाळ्याचे चार महिने या गावातील नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो.
आता हे ऐकून झालं असेल तर पुढचंही ऐका. शेगाव तालुक्यातील एकफळ या गावाचं नाव ऐकलं की या गावात कुणी लग्नासाठी मुलगी ही द्यायला तयार होत नाही. कारण कोणता बाप आपल्या मुलीला चिखलातून, बैलगाडीतून, खाटेवरून प्रवास करायला लावेल? म्हणून या गावातील अनेक मुलं ही लग्नाविना आहेत. ही वयात आलेली मुलं कुणी आपल्यासाठी स्थळ घेऊन येईल का यासाठी आतुरतेने वाट बघत असतात. पण गावाचा रस्ता बघून यांना लग्नासाठी कोणी मुलगीही द्यायला तयार नाही.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, पण कुठल्याही राजकारण्याला किंवा प्रशासनातील अधिकाऱ्याला या गावात कधी काम पडलं नसेल का? या गावातील चिमुरडी बिचारी दररोज तीन किलोमीटर आपला जीव मुठीत धरून शाळेत जाण्यासाठी रेल्वे रुळावरून प्रवास करत असतात. कारण यांच्या गावाला रस्ताच नाही. गावातील इतर नागरिकांनाही आपल्या दररोजच्या कामासाठी किंवा जीवन जगण्याच्या संघर्षासाठी जीवघेणा असा रेल्वे लाईनच्या बाजूने किंवा रेल्वे रुळावरून प्रवास करावा लागतो. अनेकदा या ठिकाणी दुर्घटना ही घडल्या आहेत पण राजकारण्यांना किंवा प्रशासनाला याचा सोयर सुतकही नाही.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालीत, देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुद्धा साजरा करण्यात आला. देशात सत्तांतरापासून ते चित्ते आणण्यापर्यंत अशा घटना घडल्या आहेत. ज्यातून सर्वच विकास झाला असं चित्र निर्माण करण्यात आलं. .मात्र अजूनही अशी काही खेडी या देशात आहेत जिथे मूलभूत असा रस्ताच नाही. त्यामुळे ग्रामीण भागावर सरकारचं किती लक्ष आहे? प्रशासनिक अधिकारी किती व्यस्त आहेत? राजकारणी कुठे आहेत? असा प्रश्न पडतोय.