Buldhana News : मी भाजपात जाणार नाही, राष्ट्रवादीतच राहणार : एकनाथ खडसे
Buldhana News : एकनाथ खडसेंनी यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली असल्याचा दावा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याला खडसेंनी पूर्णविराम दिला आहे.
Buldhana News : "मी भाजपात जाणार नाही, मी राष्ट्रवादीतच राहणार, असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपात (BJP) जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. जर येणाऱ्या काळात विरोधी पक्ष विखुरलेले अवस्थेत राहिला तर त्याचा फायदा हा भाजपाला होऊ शकतो आणि तस कारस्थान भाजपाकडून सुरु असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर आरोप यावेळी एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते बुलढाण्यात (Buldhana) बोलत होते.
एकनाथ खडसेंनी यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचा दावा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. एकनाथ खडसे आणि त्यांच्या स्नुषा तसंच भाजप खासदार रक्षा खडसे हे अमित शाहांच्या भेटीसाठी दिल्लीत गेल्याची चर्चा रंगली होती. तसंच एकनाथ खडसे हे आगामी काळात पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असाही अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु आपण भाजपमध्ये जाणार नाही, राष्ट्रवादीतच राहणार असं ठाम उत्तर एकनाथ खडसेंनी दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
एकेकाळी भाजपचे दोन खासदार असताना भाजपला हिणवलं जायचं. त्यावेळी आम्ही मोठ्या मेहनतीने पक्ष वाढवला. तर बनिया, ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांच्यामुळे बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख मिळाली असल्याचंही खडसे यांनी म्हटलं आहे.
VIDEO : Eknath Khadse on Shiv Sena : एकनाथ खडसे यांच्या मनात नेमकं काय चाललंय?- Special Report
नाराजीनंतर एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
एकेकाळी एकनाथ खडसे हे महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा होते. 2014 मध्ये ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार देखील समजले जात होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून एकनाथ खडसे हे भाजपात नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. "माझा खूप छळ झाला, किती अपमान झाला तरीही मला पक्ष सोडायचा नव्हता. परंतु त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की शेवटी मला पक्ष सोडावा लागला," असं म्हणत एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
संबंधित बातम्या