रेड्डी ग्रुपनं केली शेतकऱ्यांची फसवणूक, रोजगाराचं गाजर दाखवून शेतकऱ्यांना केलं भूमिहीन
दक्षिण भारतातील रेड्डी ग्रुपनं (Reddy Group) भंडाऱ्यातील (Bhandara) मराठी शेतकऱ्यांची (Farmers) फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

भंडारा : दक्षिण भारतातील रेड्डी ग्रुपनं (Reddy Group) भंडाऱ्यातील (Bhandara) मराठी शेतकऱ्यांची (Farmers) फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. थर्मल पॉवर प्लांटच्या माध्यमातून रोजगाराचं गाजर दाखवून शेतकऱ्यांना भूमिहीन केलं आहे. प्लांट उभारला नसल्यानं आता शेतकऱ्यांनी जमीनी परत मागितल्या आहेत. दरम्यान, रेड्डी ग्रुप ही घेतलेली जमीन दुसऱ्याचं एका ग्रुपला विकण्याच्या बेतात असल्याची माहिती मिळाली आहे.
3 गावातील सुमारे 250 शेतकऱ्यांची शेती खरेदी
थर्मल पावर प्लांटची उभारणी करुन गावातील बेरोजगारांना गावातचं रोजगार देऊ आणि गावाला सुजलाम सुफलाम करु, असं आश्वासन रेड्डी ग्रुपने शेतकऱ्यांना दिले होते. दक्षिण भारतातील रेड्डी ग्रुपनं भंडाऱ्याच्या मराठी शेतकऱ्यांची फसवणूकचं नव्हे तर, त्यांना भूमिहीन केल्याचा आरोप आता ग्रामस्थांनी केला आहे. भंडाऱ्याच्या रोहना, इंदुरखा आणि कोथूर्णा या गावातील सुमारे 250 शेतकऱ्यांची शेती या रेड्डी ग्रुपनं खरेदी केली आहे. ही खरेदी करताना शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी आणि राज्यात इतरत्र सुरू असलेल्या थर्मल पावर प्लांटमध्ये मिळणाऱ्या सर्व सोयीसुविधा देण्याचं आश्वासन देत त्यांच्या जमिनी अल्पदरात खरेदी केल्यात. मात्र आता 14 वर्ष लोटूनही या गावात थर्मल पावर प्लांटची साधी एक वीट ही लागली नाही. कुणाला रोजगारही मिळाला नाही. किंबहुना ज्या शेतकऱ्यांनी शेती दिली ते आता भूमीहीन झाले आहेत.
रेड्डी ग्रुप ही घेतलेली जमीन दुसऱ्याचं एका ग्रुपला विकण्याच्या बेता
14 वर्षानंतर आता रेड्डी ग्रुप ही घेतलेली जमीन दुसऱ्याचं एका ग्रुपला विकण्याच्या बेतात असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली आहे. त्यामुळं दक्षिणेतील रेड्डी ग्रुपनं मराठी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आता रोहना येथील शेतकऱ्यांनी केला आहे. थर्मल पावर प्लांट तयार होत नसेल तर, त्यांची शेती परत करावी, या मागणीला घेऊन आता शेतकरी आक्रमक झाले आहेत.
601 एकर शेती अधिग्रहित
थर्मल पावर प्लांटसाठी 250 हून अधिक शेतकऱ्यांची 601 एकर शेती अधिग्रहित केलीय.
2011-12 मध्ये दक्षिण भारतातील रेड्डी ग्रुपनं जमीन खरेदी केली.
रोहना, इंदूरखा आणि कोथूर्णा गावातील शेतीचा समावेश
14 वर्षानंतर बांधकामाची एक वीट ही लागली नाही
14 वर्षांपूर्वी या शेतीला एकरी 8 लाख रुपये दर देण्यात आला. आता हा दर 15 ते 20 लाख रुपयांच्या घरात पोहोचला.
पावर प्लांटला शेती दिल्यानं पूर्वी शेतकरी असलेले आता रोजगारासाठी भटकंती करीत आहे.
महत्वाच्या बातम्या:























