(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BEST Payment Kiosks : ‘बेस्ट’ बसमध्ये बसून भरता येणार सगळी बिलं, नव्या उपक्रमासाठी BEST सज्ज!
BEST Payment Kiosks : BESTद्वारे चालवल्या जाणार्या लाल रंगाच्या बसमधून प्रवास करताना, आता तुम्ही तुमची युटिलिटी बिले भरू शकता आणि पैसे काढू व जमा करू शकता.
BEST Payment Kiosks : बेस्ट बसमध्ये एटीएम-कम-बिल पेमेंट किऑस्क सुरू करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात BESTद्वारे चालवल्या जाणार्या लाल रंगाच्या बसमधून प्रवास करताना, आता तुम्ही तुमची युटिलिटी बिले भरू शकता आणि पैसे काढू व जमा करू शकता. यावर काम सुरु असून, बसेसमध्ये एटीएम-कम-बिल पेमेंट कियोस्क स्थापित करण्याच्या योजनांना अंतिम रूप देत आहे. 7 एप्रिल रोजी, BEST ने देशातील पहिली बहुउद्देशीय मोबाइल व्हॅन लॉन्च केली, जी संपूर्ण शहरात धावेल आणि लोकांकडून विविध प्रकारची युटीलिटी बिल पेमेंट स्वीकारेल.
बेस्टच्या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, ते या किऑस्क मशीन त्यांच्या सगळ्या बसेस बसवणार आहेत. याची पुष्टी करताना, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले की, ‘आम्ही एक यंत्रणा तयार करत आहोत, ज्यामध्ये आम्ही बेस्ट बसेसमध्ये किऑस्क स्थापित करू शकतो, ज्याचा वापर प्रवाशांना त्यांचे बिल भरण्यासाठी करता येईल. या किऑस्कमध्ये एटीएमसारख्या सुविधा वापरता येतील का, तेही आम्ही पाहत आहोत.’
कंडक्टरही पैसे थेट ‘बेस्ट’च्या खात्यात भरू शकणार!
या बेस्ट बसमधून प्रवास करणारे प्रवासी वीज, गॅस, पाणी, मालमत्ता आणि महापालिका कर इत्यादी विविध युटीलिटी बिले या कियॉस्कद्वारे भरू शकतील, अशी कल्पना आहे. पैसे काढणे आणि जमा करण्याची सुविधा देखील मिळाल्यास ते मशीन एटीएम म्हणूनही काम करू शकते. दररोज रोख पैसे बाळगणारे कंडक्टरही त्यांच्याजवळचे पैसे थेट बेस्टच्या खात्यात जमा करू शकतात.
बसेसमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आल्याने या मशीनवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. मोबाइल अॅपद्वारे डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा अस्तित्वात असली, तरी बिल पेमेंट स्वीकारण्यासाठी मोबाइल व्हॅन सुरू करणे हे देखील डिजिटलायझेशनच्या दिशेने एक पाऊल आहे. ‘लोक ऑनलाईन आणि अॅप्सद्वारे बेस्ट वीज बिल भरू शकत असले तरी, डिजिटल पेमेंट पद्धतींचा वापर केवळ 63-65 टक्के आहे. जर लोकांनी पेमेंट करण्यासाठी मोबाईल व्हॅनचा वापर केला, तर ते रोख स्वीकारतील जे या व्हॅनमध्ये बसलेल्या व्यक्तीद्वारे मशीनद्वारे दिले जाईल; अशा प्रकारे डिजिटल पेमेंटची व्याप्ती वाढेल,’ असे बेस्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
युटीलिटी बिले भरता येणार!
प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाइल बिले, वीज, गॅस, शाळेची फी, टेलिफोन लँडलाइन, केबल, इंटरनेट, ब्रॉडबँड, विमा प्रीमियम, पाणी, डीटीएच, फास्टटॅग खरेदी/नूतनीकरण, महापालिका कर आणि बिले, मालमत्ता कर, गृहनिर्माण संस्था शुल्क इ. इतर युटीलिटी बिले याद्वारे भरली जातील. लोक ही बिले रोखीने तसेच डिजिटल पेमेंटद्वारे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, UPI आणि RuPay वापरून भरू शकतात.
गुरुवारी अशाच एका बहुउद्देशीय मोबाइल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले असून, येत्या काही दिवसांत आणखी चार व्हॅनची भर पडणार आहे. पहिली व्हॅन वरळी, भोईवाडा, नायगाव, अँटॉप हिल, शिवाजी पार्क, रे रोड, कफ परेड, कुलाबा आणि नाना चौक या भागात सेवा पुरवेल. यात हळूहळू इतर क्षेत्रांचाही समावेश केला जाईल.