Laxman Hake vs Vijaysinh Pandit : बीडमध्ये हाके-पंडित समर्थकांमध्ये जोरदार राडा, विजयसिंह पंडितांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, चिथावणीखोर वक्तव्य केल्याने...
Laxman Hake vs Vijaysinh Pandit : लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर बीडच्या गेवराई शहरात दगडफेक करण्यात आली. हाके आणि विजयसिंह पंडित यांचे समर्थक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.

Laxman Hake vs Vijaysinh Pandit : बीडमध्ये झालेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित (Vijaysinh Pandit) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. ओबीसींच्या दारात आले तर दंडुका हातात घेणार, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले होते. यानंतर पंडित समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले. या विधानाचा निषेध करत गेवराई शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात लक्ष्मण हाके यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. आंदोलकांनी दंडुके मारत पुतळ्याला आग लावली आणि जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंडितांनी लावलेल्या बॅनरवरुन हा वाद पेटल्याचे पाहायला मिळाले आहे. याच दरम्यान, लक्ष्मण हाके हे गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले असता विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यावेळी हाके आणि पंडित यांचे समर्थक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. लक्ष्मण हाके आता बीडच्या दिशेला मार्गस्थ झाले आहेत. आता या प्रकरणावर विजयसिंह पंडित यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले विजयसिंह पंडित?
विजयसिंह पंडित एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, हाके हे फक्त समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे कुटिल कारस्थान मागच्या चार दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये येऊन करत होते. तीन-चार दिवसांपूर्वी त्यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन माझ्या विरोधात प्रतिक्रिया दिली की, दंडुक्याने मारेल, त्यांना येऊ द्या, अशा पद्धतीने त्यांनी प्रतिक्रिया दिली. ती प्रतिक्रिया दिल्यानंतर मी याबाबत कुठेही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र परत परत तेच चिथावणीखोर वक्तव्य करायचे. त्यामुळे आमचे समर्थक आणि सहकाऱ्यांची ही रिअॅक्शन आहे. क्रियेवर प्रतिक्रिया आहे. माझ्या समर्थकांनी जर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भात बॅनर लावले असतील तर त्यात समाजा-समाजात तेढ निर्माण व्हायचा प्रश्न काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
लक्ष्मण हाके हा श्वान : विजयसिंह पंडित
दरम्यान, याआधी विजयसिंह पंडित यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. लक्ष्मण हाके हा श्वान आहे. त्यावर जास्त मी बोलणार नाही आणि हा अदखलपात्र हा माणूस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे. कारण हा लढा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. आम्ही मनोज दादा जरांगे पाटील यांचे होर्डिंग लावले आहेत, त्यात चुकीच काही मजकूर लिहलं आहे का? आमच्या मतदार संघातील लोकांनी या लक्ष्मण हाके नावाच्या श्वानाला ओळखलं आहे. याने या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात प्रचार केला आहे, याने माझ्या मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला आणि गल्ली बोळ्यात फिरला, पण जिंकून कोण आलं आणि त्याने ज्या उमेदवाराचा प्रचार केला त्याच डिपॉझिट सुद्धा जप्त झालं आहे. हा दलाल श्वान आहे आणि हा स्ट्रीट डॉग आहे आणि हा रिचार्जवाला डॉग आहे, अशी टीका त्यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर केली होती.
आणखी वाचा























