Suresh Dhas : एका व्यक्तीच्या नावावर 900 कोटींचे बँक व्यवहार, 'आका'चा हा नवी परळी पॅटर्न; सुरेश धसांनी सगळंच काढलं
Suresh Dhas Vs Dhananjay Munde : परळीमध्ये रश्मिका मंदाना, सपना चौधरी यांचे कार्यक्रम बघायला मिळतात. प्राजक्ता माळीसुद्धा या ठिकाणी येतात. हाच 'आका'चा परळी पॅटर्न असल्याची टीका सुरेश धसांनी केली.
बीड : आपल्या मनाप्रमाणे कारभार करण्यासाठी बीडमधून चांगल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना आणून भ्रष्टाचार करण्यात आला. परळीमध्ये एका व्यक्तीच्या नावावर बँकेमध्ये 900 कोटींचे हस्तांतरण झाल्याचं दिसून येतंय आणि त्यामागे परळीचा 'आका' आहे असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केला. महादेव बेटिंग अॅप भ्रष्टाचाराचा तपास केला असता तो मलेशियापर्यंत पोहोचेल असा आरोपही त्यांनी केला. यासंबंधित सर्व कागदपत्रे ही पोलिस अधीक्षकांना दिले असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं.
आमदार सुरेश धस यांनी बीडचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा केली. त्यानंतर सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, परळीमध्ये एकाच व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचे बँक व्यवहार झाले आहेत. दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावावरही तसेच व्यवहार झाले आहेत. यावर कोणत्या यंत्रणेने तपास केला पाहिजे? परळीत दोन लोकांकडे मोठं घबाड आहे. अजून असे किती लोक असतील याची माहिती घेतली पाहिजे.
महादेव अॅपच्या माध्यमातून परळीतील लोकांनी अब्जावधी पैसे कमावले असून त्यांच्यामागे त्यांचा 'आका' आहे. महादेव अॅपचा तपास केला असता त्याची लिंक ही परळीतून मलेशियापर्यंत पोहोचेल असं सुरेश धस म्हणाले. याच्या मागे सुद्धा 'आका' आहे . बीडमधील कोणतंही प्रकरण घ्या, त्याच्यामागे एकच 'आका' आहे.
परळी म्हणजे गँग्ज ऑफ वासेपूर
एका ठिकाणी 50 एकर जमीन घेतली. गरिबांच्या जमिनी लाटल्या. कुणाच्या नावावर किती जमीन आहे ते पाहा. बीड म्हणजे गँग्ज ऑफ वासेपूर झालंय असा आरोप सुरेश धस यांनी केला. 1400 एकरच्या जवळपास गायरान जमीन शिरसाळा गावात आहे. आकाचे बगलबच्चे या ठिकाणी काम करतात. त्या ठिकाणच्या 600 विट भट्ट्यांपैकी 300 विटभट्ट्या या अवैध जागेवर आहेत. देवीच्या मंदिरासाठी 8 एकर जागा होती. ती लाटली. बंजारा समाजाच्या लोकांची जागाही लाटली. त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले. हा 'आका' चा कोणता नवीन पॅटर्न आहे असा सवाल सुरेश धस यांनी विचारला.
बीडमध्ये सुरू असलेल्या या सगळ्या प्रकरणांची आपल्याकडे कागदपत्रं असून त्याचा पोलिसांनी तपास करावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
ही बातमी वाचा :