Santosh Deshmukh : वाल्मिक कराडच्या संपर्कातील अधिकाऱ्यांना वगळलं, संतोष देशमुख प्रकरणी नवीन SIT; देशमुख कुटुंबाच्या आक्षेपानंतर निर्णय
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देखमुखांच्या हत्येला 35 दिवस झाले तरी तपास कुठपर्यंत आला याची माहिती दिली जात नसल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केला आहे.
मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या जुन्या एसआयटीच्या ठिकाणी आता नवीन एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ही माहिती दिली. या आधीच्या एसआयटीमध्ये वाल्मिक कराडच्या जवळचे आणि संपर्कातील अधिकारी असल्याचा आरोप करण्यात येत होता. आता देशमुख कुटुंबीयांच्या आरोपानंतर या प्रकरणाचा तपास नवीन एसआयटी करणार आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 1 जनवरी 2025 ला एसआयटी स्थापन करण्यात आली होती. त्या एसआयटीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी हरकत घेतली होती. त्या एसआयटीमध्ये असलेले काही पोलिस हे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड यांच्यासोबत डायरेक्ट संपर्कात असल्याचा आरोप केला जात होता. त्या संबंधी सोशल मीडियावरही फोटो व्हायरल होत होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नाही, यातील वाल्मिक कराडला वाचवलं जात असल्याचा आरोप सातत्याने होत होतो.
नव्या एसआयटीमध्ये सात सदस्य
संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला असला तरी त्याचा तपास नेमका कुठपर्यंत आला याची माहिती दिली जात नसल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला होता. त्यानंतर आता राज्य सरकारने नवीन एसआयटी स्थापन केली आहे. आधीच्या एसआयटीमध्ये 10 सदस्य होते. तर नवीन एसआयटीमध्ये सात सदस्य असणार आहेत.
SIT should be disbanded. चांगल्या ऑफिसर ना आणा हीच मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 13, 2025
SIT आता नव्याने बनवली गेली आहे त्याचे स्वागत.
आता वाल्मिक कराड वर तात्काळ मोक्का लावा #santoshdeshmukhcase pic.twitter.com/IG4utZXEri
वाल्मिक कराडची पुण्यात कोट्यवधींची संपत्ती
सध्या चांदा ते बांदा आणि गल्ली ते दिल्ली गाजत असलेलं प्रकरण म्हणजे बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या. या हत्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नसला तरी सर्वपक्षीयांच्या रडारवर आहे तो वाल्मिक कराड. या वाल्मिक कराडने आणि त्याच्या टोळीने वेगवेगळ्या शहरांत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होत आहे. पुण्यात मोक्याच्या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजच्या समोर वाल्मिक कराडनं 25 कोटी रुपये मोजून ऑफिस प्रीमायसेस विकत घेतल्याचं बोललं जातंय. याच आर्थिक व्यवहाराच्या तपासासाठी ईडीची एन्ट्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धनंजय देशमुखांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 35 दिवस उलटूनही कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे. शिवाय खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला खुनाच्या गुन्ह्यात सहआरोपी न केल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं दिसून आलं. हत्या झालेल्या संतोष देशमुखांचे लहान भाऊ धनंजय देशमुखांनी पोलिसांना चकवा देत, थेट पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन केलं.
दोन तास विनवणी केल्यानंतर अखेर धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरले. टाकीवरुन खाली उतरल्यानंतर धनंजय देशमुखांनी पोलिसांकडून तपासासंदर्भात कोणतीच माहिती दिली जात नसल्याचा आरोप केला. यावेळी ग्रामस्थांनी सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी मंगळवारी दहा वाजेपर्यंतचा अल्टीमेटम दिला. मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला.
कुणालाही सोडू नका, मुख्यमंत्र्यांचे आदेश
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बीडचे पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला आहे. एकही आरोपी सुटता कामा नये अशा सूचना त्यांनी तपास यंत्रणांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत आणि एसआयटी प्रमुखांना फोन करुन तपासात कुणालाही दयामाया दाखवू नका असे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणांना दिले आहेत.