Beed : धनंजय मुंडे, क्षीरसागर ते सुरेश धस... निकटवर्तीयांच्या कारनामाम्यांमुळे बीडचे नेते अडचणीत
Santosh Deshmukh Murder Case : आधी धनंजय मुंडे, त्यानंतर सुरेश धस, आता संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंखे... बीडमधील हे सगळेच नेते त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे अडचणीत येताना दिसत आहेत.

बीड : आतापर्यंत नेत्यामुळे कार्यकर्ते अडचणीत आल्याचं अनेकवेळा महाराष्ट्राने पाहिलं आहे, मग ते पक्षांतर असो वा इतर कोणत्याही भूमिकेमुळे. पण आता कार्यकर्ते आणि निकटवर्तीयांमुळे अडचणीत येत असल्याचं दिसतंय. बीडमध्ये तर बहुतांश मोठे नेते आता त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कृत्यांमुळे अडचणीत येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या निकटवर्तीयाचा कारनामा समोर आला आहे. सुशील सोळंके आणि त्याच्या पत्नीकडून मल्टी सर्विस चालकाला बेदम मारहाण करण्यात आली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे सोळंकेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाल्मिक कराडच्या गँगमुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके हेदेखील अडचणीत येत असल्याचं दिसतंय. धनंजय मुंडे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्या नंतर आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाचा कारनामा समोर आला आहे.
सुशील सोळंके आणि पत्नीकडून मारहाण
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडमुळे अडचणीत सापडलेले धनंजय मुंडे, त्यांच्यानंतर बीड जिल्ह्यातून अनेक लोकप्रतिनिधींच्या निकटवर्तीयांचे कारनामे समोर येत आहेत. सुरेश धस हे सतीश भोसले उर्फ खोक्यामुळे अडचणीत आले. त्यानंतर संदीप क्षीरसागर यांच्या पीएचा मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आले. आता त्यानंतर माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाचा देखील एक कारणामा समोर आला आहे.
आमदार प्रकाश सोळंके यांचा निकटवर्तीय सुशील सोळंके आणि त्याची पत्नी एका मल्टी सर्विसेस दुकानात मल्टी सर्विस चालकाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल माध्यमातून चांगलीच व्हायरल होत आहे.
गुन्हा दाखल, पण अटक नाही
या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही अद्याप सुशील सोळंकेला अटक झालेली नाही. उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सुशील सोळंके माजलगावमध्ये असताना देखील पोलिस त्याला अटक का करत नाही? असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान, या व्हिडीओमुळे आमदार प्रकाश सोळंके यांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
बीडमध्ये नेमके किती आका?
दरम्यान, बीडमध्ये नेमके किती आका असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी आरोपी वाल्मिक कराडला आकाचा उपमा दिली. तर धनंजय मुंडेंना त्यांनी आकाचा आका अशी उपमा दिली. मात्र त्याच सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या हा मारहाण आणि वन्यजीव हत्या प्रकरणी फरार आहे. हे कमी म्हणून की काय, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यावर देखील कारच्या शोरूम मॅनेजरला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे बीडमधले लोकप्रतिनिधी अशा किती गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना पोसताहेत असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.
























