Panjaka Munde : पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल? बीडमधील मुंडे समर्थकानं संपवलं आयुष्य
Beed : बीडमधील एका मुंडे समर्थकाने टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं आहे. तसेच पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे त्याने आयुष्य संपवलं असल्याचं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.
Panjaka Munde : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळ आंबा गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंकजा मुंडे यांचे समर्थक पांडुरंग सोनवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आलीये. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा लोकसभेतील पराभव जिव्हारी लागला म्हणून पांडुरंगने आपले जीवन संपवलं असल्याचं जवळच्या नातेवाईकांकडून सांगितले जात आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून यंदा पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून बजरंग सोनावणे रिंगणात होते. नुकताच बीड लोकसभेचा निकाल हाती आला या निकालात महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. दरम्यान त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये बरीच नाराजी पाहायला मिळाली.
बीडमध्ये अटीतटीची लढत
शेवटच्या मिनिटापर्यंत बीड लोकसभेची निवडणूक ही अटीतटीची झाली. या निवडणुकीत पहिल्यांदाच मोठा जातीय रंग पाहायला मिळाला. यावर पंकजा मुंडे यांनी देखील उघड वक्तव्य केलं होतं. या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा निसटता पराभव झाला. त्यामुळे बहुतांश मुंडे समर्थक नाराज आहेत. अशातच काल म्हणजेच शनिवार 8 जून रोजी एका मुंडे समर्थकांनी आत्महत्या केली होती या आत्महत्ये नंतर आज अंबाजोगाई तालुक्यातील दिघोळ आंबा गावातील पांडुरंग सोनवणे या तरुणाने देखील आत्महत्या केली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय.
सचिन मुंडे यांचा अपघाती मृत्यू
भाजपच्या (BJP) बीडच्या (Beed News) उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) निवडून आल्या नाहीत तर सचिन गेला, असा व्हिडिओ करणाऱ्या तरुणाचा अपघाती (Accident News) मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र या अपघाती मृत्यूनंतर सोशल मीडियावर त्याने आत्महत्या केल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सचिन कोंडिबा मुंडे हा व्यक्ती लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात यस्तर या गावचा रहिवासी होता. सचिन मुंडे व्यवसायाने ट्रॅक्टर चालक. लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वी सचिनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पंकजा मुंडे यांचा विजय झाला नाही तर सचिन गेला असा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता शुक्रवारी 7 जून म्हणजेच काल रात्री साडेआठ नंतर सचिनचा मृतदेह बोरगाव पाटीजवळ आढळून आला.