Nagpur Winter Season : चहापानाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहणार
उद्यापासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी चहापानाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहणार आहे. दरम्यान विरोधकांनी देखील चहानापाच्या कार्यक्रमाला बहिष्कार घातला आहे. मात्र, या आमंत्रणाला विरोधकांनी बहिष्कार घालत सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. याबाबत नागपूरमध्ये विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर (Mahayuti Government) जोरदार टीका केली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महायुती सरकारच्या अपयशाची कुंडलीच सादर केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधारी पक्षाकडून वैयक्तिक चहापानाचं निमंत्रण काल आम्हाला मिळाले. गेल्या अनेक वर्षांची परंपरा आणि प्रथेने विरोधी पक्षाला निमंत्रण दिले जाते. दुर्दैवाने सत्ताधाऱ्यांची मनसुबा आहे की, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष नेते नाहीत. दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष नेते पद रिक्त आहे. हे दोन्ही पद संविधानिक पद आहे. दोन्ही संविधानिक पदे रिक्त ठेवून संविधानावर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहापानाला जाण्याचे आम्ही टाळले आहे. त्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
Vijay Wadettiwar: सरकारला मनमानी कारभार करायचाय
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात दररोज सहा ते सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे सांगून मतं घेतली आणि आता तारीख पे तारीख देत आहेत. जूनचा मुहूर्त काढल्याचे सांगितले जात आहे. पण, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पत्ता नाही. 1980 भारतीय जनता पक्षाचे 14 आमदार होते. तरीही विरोधी पक्षनेते पद दिले गेले. 1985 साली भारतीय जनता पक्षाचे 16 आमदार होते, तरीदेखील विरोधी पक्ष नेते दिले गेले होते. काँग्रेसने कधीही सत्ताधारी म्हणून संविधानिक पद रिक्त ठेवले नाही. मात्र, या लोकांना विरोधकांची भीती वाटते की काय किंवा सरकारला मनमानी कारभार करायचा आहे. वाटेल त्या पद्धतीने राज्याचा गाडा हाकायचा आणि काम करायचं. त्यामुळे दोन्ही पद रिक्त ठेवून चहा पानाला बोलवत असतील तर त्यावर बहिष्कार टाकलेला बरा. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे, असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला.























