Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Beed Crime: वाल्मिक कराडांना मोक्का लागताच सुरेश धस लगबगीने मंत्रालयाकडे रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
बीड: आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराड यांना मंगळवारी मोठा झटका बसला. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केज सत्र न्यायालयातील सुनावणीवेळी वाल्मिक कराड याच्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे वाल्मिक कराड याच्या सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच विशेष तपास पथकाने या सगळ्यावर विरजण टाकले. विशेष तपास पथकाकडून (SIT) वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी मकोका कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. हा वाल्मिक कराड याच्यासाठी मोठा झटका मानला जात असून यामुळे त्याचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा सुरु झाली आहे.
वाल्मिक कराड यांच्या मकोका लागताच सुरेश धस हे लगबगीने मंत्रालयाच्या दिशेने रवाना झाले होते. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वाल्मिक कराडवरील कारवाईवर प्रतिक्रिया दिली. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात एकालाही सोडणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. एसआयटीने त्यांचे काम दाखवले. कुणी मागणी केली म्हणून मकोका लागत नाही. पोलिस यंत्रणा आणि एसआयटी काम करत आहे. त्यांनी जी कडी जोडली आहे त्यानुसार कारवाई झाली. जिथे जिथे कडी जोडली जाईल तिथपर्यंत कारवाई केली जाईल, असे सुरेश धस यांनी म्हटले.
वाल्मिक कराड यांना आता बीड कारागृहात नेले जाईल. याठिकाणी त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या मोक्का अंतर्गत ताब्यात घेऊन केज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाईल. पण आता सेशन कोर्टामध्ये सीआयडीने अर्ज केला आहे कदाचित सीआयडी त्यांना आज सुद्धा हजर होण्यास सांगू शकते, अशी माहिती आहे.
सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश
केजचे भाजप आमदार सुरेश धस यांनी पहिल्या दिवसापासून संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण लावून धरले होते. त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदा सविस्तरपणे या सगळ्या घटनाक्रमावर प्रकाश टाकला. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतरही सुरेश धस यांनी नेटाने हे प्रकरण लावून धरले. सुरेश धस यांनी 'आका' आणि 'आकांचे आका' असा उल्लेख करत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याविरोधात अक्षरश: रान उठवले होते.
वाल्मिक कराड यांचा फक्त खंडणी नव्हे तर संतोष देशमुख यांच्या हत्येशी थेट संबंध आहे. त्यांच्यावर 302 चा गुन्हा आणि मकोका कायद्यातंर्गत कारवाई व्हावी, अशी आग्रही मागणी आमदार सुरेश धस सातत्याने करत होते. वाल्मिक कराड यांना मकोका लागल्याने धस यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आल्याचे बोलले जात आहे.
आणखी वाचा
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?