Ramdas Athawale : शरद पवारांनी महाविकास आघाडी सोडून मोदींसोबत काम करावं; रामदास आठवलेंचं वक्तव्य
Ramdas Athawale : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बीड जिल्ह्यातील मुख्य कार्यालयाचा उद्घाटनासाठी रामदास आठवले आले होते.
Ramdas Athawale On Sharad Pawar: राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) अनुभवी नेते असून, त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (Narendra Modi) काम करावं असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले आहे. आठवले हे उस्मानाबादच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आज बीडमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्ह्यातील मुख्य कार्यालयाचा उद्घाटन केलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, "शरद पवार हे अनुभवी आणि मोठे नेते आहेत. त्यांनी नागालँडमध्ये भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करावं अशी माझी इच्छा आहे." नागालँडमध्ये पवार साहेबांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी आता महाविकास आघाडीमधून बाहेर पडून मोदी साहेबांसोबत काम करावं अशी इच्छा रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
नागालँडप्रमाणे महाराष्ट्रातही करिष्मा करुन दाखवणार
पुढे बोलताना आठवले म्हणाले की, "नुकत्याच झालेल्या नागालँड येथील निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला दोन जागा मिळाल्या असून, जसा करिष्मा नागालँडमध्ये झाला आहे तसाच करिष्मा येत्या काळात महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत करुन दाखवणार आहे." मात्र या निवडणुकीत आपण भाजप आणि शिंदे यांच्यासोबत राहून आपल्या पक्षाचे खातं उघडणार असल्याचं आठवले म्हणाले.
रामदास आठवले यांचे जंगी स्वागत
रामदास आठवले हे उस्मानाबादच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आज बीडमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या त्यांच्या पक्षाच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी रामदास आठवले हे बीडमध्ये आले असता त्यांची ओपन जीपमधून मिरवणूक काढण्यात आली होती. तर जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करुन रामदास आठवले यांचे जंगी स्वागत कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
तर नेहमीप्रमाणेच आपल्या कवितेच्या माध्यमातून आठवले यांनी शिंदे आणि फडणवीस यांच अभिनंदन केले आहे. सामाजिक आर्थिक आणि औद्योगिक यासह सर्व बाबींचा विचार करुन हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या हिताचा असल्याचे आठवले म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं!
प्रकाश आंबेडकर यांची युती ही फक्त शिवसेनेची झाली आहे. ते अजूनही महाविकास आघाडीत गेलेले नाही. त्यामुळे मी दोन पावलं मागे यायला तयार असल्याचं रामदास आठवले म्हणाले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये कितीही नेते उभे राहिले तरी त्यांचा पराभव करणे कोणालाही शक्य होणार नाही. त्यामुळे सर्व दलित नेत्यांनी एकत्र येऊन रिपब्लिकन पक्षामध्ये दाखल व्हावं आणि बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच पक्षाची आवश्यकता असते गरजेचे आहे असं देखील आठवले म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
अर्थसंकल्प: तीन मंत्री असूनही छ.संभाजीनगरच्या निधीत आखडता हात; 'मविआ'च्या काळात मिळाली होती वाढ