Lok Sabha Elections: लोकसभा निवडणूक लढवणार का? धनंजय मुंडे म्हणतात...
Lok Sabha Elections: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियातून व्हायरल झाली होती.
Lok Sabha Elections : गेल्याकाही दिवसांपासून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात मुंडे बहिण-भावाची लढत पाहायला मिळणार असल्याची देखील चर्चा आहे. मात्र या सर्व चर्चांवर आता खुद्द धनंजय मुंडे यांनीच खुलासा केला आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याचा माझा कोणताही विचार नसल्याचा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे.
दरम्यान यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, दिल्ली माझ्यासाठी दूर आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याचा माझा कोणताही विचार नसून पक्षानेही तशी माझ्याशी काही चर्चा केलेली नाही. अजून किमान वीस ते पंचवीस वर्ष मी याबाबत विचार करु शकत नाही असे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला स्वतः धनंजय मुंडे यांनीच विराम दिला आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
नगर येथे 9 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यव्यापी सभा होणार असून या सभेच्या पूर्वतयारीनिमित्त रविवारी बीडमध्ये आयोजीत बैठकीसाठी धनंजय मुंडे आले होते. यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, विद्यमान खासदार हे निष्क्रिय असल्याचे जनतेलाच दिसते आहे. लातूरला जो रेल्वे कोच निर्मितीचा प्रकल्प झाला, तो बीडला झाला असता तर जवळपास पन्नास हजार कोटींची गुंतवणूक बीडमध्ये झाली असती. तो प्रकल्प बीडला आणण्यात खासदारांना अपयश आले.
वैद्यनाथमधील अॅडजस्टमेंटबाबत धनंजय मुंडे म्हणाले, माझा प्रवास कमळाकडे नसून त्यांचा (पंकजा मुंडे) प्रवास घड्याळाकडे आहे का, असा प्रश्न त्यांना विचारायला हवा. वैद्यनाथ कारखाना हा स्व. गोपीनाथ मुंडे, पंडितअण्णा मुंडे यांनी उभा केलेला आहे. सध्या या कारखान्यावर 1 हजार कोटींचे कर्ज असून या कारखान्याला पुनर्वैभव प्राप्त करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यातही वैद्यनाथची निवडणूक अजून बिनविरोध झालेली नाही.
संभाव्य उमेदवारांची यादी सोशल मीडियावर व्हायरल
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी काही दिवसांपूर्वी सोशल मिडियातून व्हायरल झाली होती. या यादीत धनंजय मुंडे यांच्याही नावाचा समावेश होता. त्यामुळे धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. एवढचं नाही तर लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात मुंडे बहिण-भाऊ समोर येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. पण धनंजय मुंडे यांनी स्वतः यावर खुलासा करत चर्चेला ब्रेक लावला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
कर्नाटकमधील 'कमिशन सरकार'च्या आरोपांनंतर महराष्ट्रातही भाजपच्या मंत्र्यावर 10 टक्क्यांचा आरोप