Vinayak Mete: आम्ही जाऊ नका म्हणत होतो तरी गेले आणि होत्याचं नव्हतं झालं; मेटेंच्या घरच्यांची प्रतिक्रिया
Vinayak Mete Death : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाची बैठक बोलावली असल्याने मेटे रात्रीच मुंबईला निघाले होते.
Vinayak Mete Death: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुळात बुडाला आहे. तर मेटे कुटुंबावर जणू दुःखाच डोंगर कोसळले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मेटे मुंबईला निघाले असतानाच त्यांच्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) झालेल्या अपघातात मृत्यू झाला. तर रात्रीचा वेळ असल्याने आता निघू नका असा सल्ला मेटे यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिला होता. मात्र महत्वाची बैठक असल्याचे सांगत ते मुंबईला निघाले आणि होत्याचं नव्हतं झालं असे म्हणत मेटेंच्या कुटुंबातील सदस्यांनी टोह फोडल्याचे पाहायला मिळाले.
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाची बैठक बोलावली होती. यासाठी राज्यातील सर्वच प्रमुख मराठा नेत्यांना या बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आले होते. मेटे यांना सुद्धा या बैठकीचे आमंत्रण होते. दुपारी 12 वाजता बैठक होणार असल्याने मेटे रात्रीच मुंबईकडे निघाले होते. मात्र त्यांच्या वाहिनी वैशाली मेटे यांनी रात्रीची वेळ झाली असून, आता जाऊ नका असा सल्ला त्यांना दिला होता. तसेच आत्ता जाण्यापेक्षा सकाळी निघा असेही म्हणाल्या होत्या. पण महत्वाची बैठक असल्याने वेळेवर पोहचावे लागेल म्हणून, मेटे रात्रीच निघाली आणि होत्याचं नव्हतं झालं अशी प्रतिक्रिया मेटेंच्या नातेवाईकांनी दिली आहे.
बैठकीची वेळ कोणी बदलली...
विनायक मेटे यांच्या निधनानंतर प्रतिक्रीया देतांना मराठा समाजाचे नेते दिलीप पाटील म्हणाले की, पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झालेला आहे. मेटे हे या बैठकीसाठी रात्री बीडहून निघाले होते. मराठा समाजाची 12 वाजता अर्जेंट बैठक बोलावली गेली. विशेष म्हणजे काल दुपारी अकरा-बारा वाजेच्या दरम्यान निरोप देण्यात आले होती की, संध्याकाळी 4 वाजता बैठक होईल. मात्र नंतर संध्याकाळी 7 वाजता पुन्हा अर्जंट निरोप असल्याचे सांगत बैठक 12 वाजता असल्याचा सांगण्यात आले. त्यामुळे या बैठकीच्या वेळेत कुणी आणि का बदल केला याची चौकशी करण्याची मागणी दिलीप पाटील यांनी केली.
मेटे दोनवेळा म्हणाले मुंबईत कसं येऊ...
यावेळी पुढे बोलतांना दिलीप पाटील म्हणाले की, ज्यावेळी बैठकीच्या वेळेत बदल करण्यात आला, त्यावेळी मेटे यांची बीडमध्ये बैठक सुरु होती. तर चार वाजता होणारी बैठक आता 12 वाजता होणार असल्याचा निरोप मेटे यांना सुद्धा मिळाला. मात्र मी बीडमध्ये असून बैठक सुरु आहे, त्यामुळे एवढ्या कमी वेळेत कसं येऊ असे मेटे दोन वेळा बैठकीतूनच म्हणाले. मात्र 12 वाजताच बैठक होणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळेच ते रात्री निघाले असल्याच दिलीप पाटील म्हणाले.