(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed News : एकतर्फी प्रेम, लग्न मोडण्यासाठी 'मिसिंग लव्ह' म्हणत मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल; तरुण अटकेत
Beed Crime News : बीडमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने सोशल मीडियावर एका मुलीसोबतचे फोटो व्हायरल करुन तिचं लग्न मोडण्यासाठी प्रयत्न केले.
Beed Crime News : बीड जिल्ह्यात (Beed District) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने सोशल मीडियावर (Social Media) एका मुलीसोबतचे फोटो व्हायरल करुन तिचं लग्न मोडण्यासाठी प्रयत्न केले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन थेट लातूर गाठत आरोपी तरुणाला ताब्यात घेतल्याने मुलीचं लग्न लागले. तसेच पोलिसांनी या तरुणाच्या नातेवाईकांना देखील पोलीस ठाण्यात नेऊन त्यांना सर्वांना समजावून सांगत मनपरिवर्तन केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या केज तालुक्यातील एका मुलीवर लातूर जिल्ह्यातील तरुण एकतर्फी प्रेम करत होता. तसेच केज तालुक्यात त्याचे नातेवाईक असल्याने तो चारचाकी गाडी घेऊन बीडला यायचा. यातूनच दोघांची ओळख झाली. त्यामुळे बोलणे वाढले. दोघांनीही सोबत काही फोटोही काढले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी या मुलीचे लग्न जुळले. तसेच 30 मे रोजी लग्नाची तारीख देखील ठरली. मात्र याबाबत लातूरच्या तरुणाला माहिती मिळाली आणि त्याने मुलीसोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. तसेच फोटोसोबत 'मिसिंग लव्ह' अशा ओळीही लिहिल्या. हा प्रकार मुलीच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले. तसेच मुलाच्याविरोधात मुलीने फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
दिवसभर ठाण्यात बसवून ठेवण्यात आले
एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने सोशल मीडियावर एका मुलीसोबतचे फोटो व्हायरल केले. त्यावर 'मिसिंग लव्ह' अशा ओळी लिहिल्या. हा प्रकार मुलीच्या लग्नाच्या आधी चार दिवसांनी घडला. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेत मुलीचे सुखरुप लग्न होऊ दिले. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे तरुणासोबतच त्याच्या कुटुंबातील आठ ते दहा सदस्यांनाही लग्नाच्या दिवशी काही गोंधळ घालू नये, यासाठी दिवसभर ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते.
पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली
दरम्यान 30 मे रोजी मुलीच्या लग्नात धिंगाणा करण्याचा प्लॅन मुलासह त्याच्या काही नातेवाईकांनी केला होता. यासाठी दोन वाहनेही तयार ठेवली होती. परंतु, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच बीड पोलिसांनी लातूर गाठले. तसेच मुलासह त्याच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन सर्वांना समजावून सांगत मनपरिवर्तन केले. मुलाचे आणि त्याच्या कुटुंबीयांचेच नव्हे तर नवरदेवाचेही समुपदेशन पोलिसांनी केले. त्यामुळे ठरल्याप्रमाणे लग्न सोहळा पार पडला. त्यामुळे या सर्व प्रकरणात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली.
इतर महत्वाच्या बातम्या: