(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed News : पुतणीला पाहून बदलला विचार, चुलत्यानेच केला तिच्यावर अत्याचार; न्यायालयाने सुनावली सक्तमजुरीची शिक्षा
Beed Crime News : न्यायालयात झालेल्या संपूर्ण सुनावणीनंतर अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला वीस वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
Beed News : पुतणीवर अत्याचार करणाऱ्या एका चुलत्याला अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने वीस वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली असून, दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. चार वर्षांपूर्वी चुलत्यानेच आपल्या अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात झालेल्या संपूर्ण सुनावणीनंतर अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला वीस वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. सद्दाम रहीम शेख (रा. मलिकपुरा, परळी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
बीडच्या अंबाजोगाई येथील अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केल्याप्रकरणी चुलत्यास दोषी ठरवत वीस वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायाधीश संजश्री घरत यांनी ठोठावली. परळी येथील सद्दाम पी. रहीम शेख याची पाच वर्षीय पुतणी घरात खेळत होती. यावेळी घरात कोणीही नसल्याच्या फायदा घेत त्याने पुतणीवर अत्याचार केला. घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, मुलगी पडली म्हणून आईने तिची विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या आईने 1 सप्टेंबर 2018 रोजी परळी शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास सहा. पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी केला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीपुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. शिवाजी मुंडे यांनी काम पाहिले.
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
हाय, हॅलो असे मोबाइलवर मेसेज पाठवून जवळीक साधली आणि त्यानंतर प्रेमाचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवत 19 वर्षांच्या मुलीवर चार महिन्यांपासून अत्याचार केला. मात्र प्रत्यक्षात दुसरीसोबतच लग्न केल्याने संतापलेल्या पीडितेने थेट पोलिस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. त्यामुळे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी गुन्हा दाखल झाल्याने हळदीच्या अंगासह नवरदेव फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना 29 मे रोजी वडवणी तालुक्यात उघडकीस आली आहे. पोपट आसाराम मुंडे (वय 25, रा. चारधरी, ता. धारूर) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी पोपटचे वडवणी शहरात भांड्याचे दुकान आहे. त्याने जानेवारी महिन्यात पीडितेचा मोबाइल क्रमांक घेऊन तिला हाय, हॅलो असे मेसेज केले. आपण पाहुणेच आहोत, असे म्हणत तिला विश्वास दिला. त्यानंतर हळूहळू जवळीक साधत प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचे आमिष दाखविले. परंतु नंतर लग्नास नकार दिला. पोपटचे 1 जून रोजी लग्न होणार होते. परंतु पीडितेला हे समजताच तिने घरी धाव घेतली. यावर पोपटने 28 मे रोजीच लग्न उरकून घेतले. हा प्रकार समजताच पीडितेने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.
इतर महत्वाच्या बातम्या: