'अरे बाबा पीक विमा मंजूर केला, पण मिळणार कधी, तुझे पाच वर्ष संपल्यावर..'; करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Karuna Sharma On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी पीक विमा मंजूर करून आणल्याचे सतत बोलले जात आहे. अरे बाबा पीक विमा मंजूर केला, पण तो मिळणार कधी, तुझे पाच वर्ष संपल्यावर मिळणार का?: करुणा शर्मा
छत्रपती संभाजीनगर : करुणा शर्मा (Karuna Sharma) आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील वाद काही नवीन नाही. दरम्यान, आता पुन्हा एकदा करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याचा आरोप करत शर्मा यांनी मुंडेंवर हल्लाबोल केला आहे. "धनंजय मुंडे यांनी पीक विमा मंजूर करून आणल्याचे सतत बोलले जात आहे. अरे बाबा पीक विमा मंजूर केला, पण तो मिळणार कधी, तुझे पाच वर्ष संपल्यावर मिळणार का? असा खोचक टोला करुणा शर्मा यांनी मुंडे यांना लगावला आहे.
करुणा शर्मा यांनी फेसबुक लाईव्ह करत म्हटले आहे की, “जेव्हापासून धनंजय मुंडे कृषिमंत्री, पालकमंत्री झाले तेव्हापासून काही माध्यमांमध्ये एकच बातमी पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांनी पीक विमा मंजूर केला अशाच बातम्या सतत पाहायला मिळत आहे. अरे पीक विमा मंजूर केला आम्हाला माहित आहे. पण भेटणार कधी बाबा, तुझे पाच वर्ष संपल्यावर विम्याची रक्कम मिळणार का?, किंवा तू घरी बसल्यावर दुसरा कोणी मंत्री झाल्यावर याचा लाभ मिळणार का?, असा टोला करुणा शर्मा यांनी लगावला आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी तुला माहित आहे का?
बीड जिल्ह्यात खूप वाईट परिस्थिती आहे. महिलांसाठी शहरात शौचालय नाही. गावात मोठ-मोठे खड्डे असल्याने अनेकांचे हात-पाय तुटतात. उसतोड कामगारांची खूप वाईट परिस्थिती आहे. असे असतांना आज हे लोकं दहा ते वीस कोटींच्या गाडीत फिरतात. गळ्यात गमछा टाकून उसतोड कामगारांचे कैवारी असल्याचे दाखवतात. स्वतःला शेतकरी पुत्र असल्याचे सांगून देखावा करतात. पण शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत तुला माहित आहे का? असेही करुणा शर्मा म्हणाल्यात.
एकाच रस्त्याचे पाचवेळा नारळ फोडतात...
नुसत्या घोषणा करण्यापेक्षा काम करून दाखवावे. आमदार झाल्यावर एका रस्त्याचे उद्घाटन करून नारळ फोडतात. दुसऱ्या वर्षी पुन्हा त्याच रस्त्याचे नारळ फोडले जाते. असे पाच वर्षे पाचवेळा एकाच रस्त्याचे नारळ फोडून देखील त्याचे काम होत नाही. हे लोकं फक्त नारळच फोडतात. मात्र, विकास काम काही होत नाही. आम्ही हे केलं ते केलं असे सांगून फक्त खोट्या बातम्या पसरवल्या जातात. स्वतःवर जेसीबीतून फुल उधळून घेतात. यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले नाही. त्यामुळे हे आमदार, खासदार आणि मंत्री आपले नोकर असल्याचे जनतेने समजून घेतलं पाहिजे, असेही करुणा शर्मा म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या: