Beed : स्वत:ची संपत्ती वाढवण्यासाठी ते वैद्यनाथ कारखाना चालवत आहेत; धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे यांच्यावर आरोप
एकीकडे ज्यांची संपत्ती तराजूमध्ये देखील मोजता येत नाही अशी लोकं शेतकऱ्यांचे हित नाही तर व्यवहार बघतात अशी टीका धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे.
बीड: पंकजा मुंडे या संपत्ती वाढवण्यासाठी वैद्यनाथ कारखाना चालवत आहेत असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांनी चालवायला घेतलेल्या 'आंबा साखर' या साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याकडे असलेल्या वैद्यनाथ कारखान्याच्या कारभारावर सडकून टीका केली आहे.
ते संपत्ती वाढवण्यासाठी वैद्यनाथ कारखाना चालवत आहेत
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर टीका करताना म्हणाले की,"आशिया खंडात नाव असलेला वैद्यनाथ कारखान्याने गेल्या वर्षी शेतकऱ्यांना पंधराशे रुपये प्रमाणे भाव दिला आहे. मी मात्र मोठ्या अडचणीच्या काळातदेखील एफआरपी कमी असताना कारखाना चालवायला घेतला आणि शेतकऱ्यांना योग्य भाव दिला. मी संपत्ती वाढवण्यासाठी नाही तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आणि त्यांना दुप्पट उत्पादन मिळावं यासाठी हा कारखाना चालवायला घेतला आहे."
मी घरावर तुळशीपत्र ठेवून शेतकऱ्यांसाठी कारखाना चालवतोय
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, "पंडित अण्णा मुंडे हे आंबा साखर कारखान्याचे सभासद होते आणि त्यांचाच वारस म्हणून आता मी हा कारखाना चालवायला घेतला आहे. मी माझ्या घरावर तुळशीपत्र ठेवेन, मात्र हा कारखाना असाच चालू राहील आणि यातून या परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही याची खबरदारी घेईन."
ज्यांची संपत्ती तराजूतही मोजता येणार नाही ते शेतकऱ्यांच हित सोडून व्यवहार बघतात
वैद्यनाथ कारखान्याच्या कारभारावर टीका करताना धनंजय मुंडे म्हणाले की, "एकीकडे ज्यांची संपत्ती तराजूमध्ये देखील मोजता येत नाही अशी लोकं शेतकऱ्यांचे हित नाही तर व्यवहार बघतात. आंबा साखर कारखाना चालवायला घेताना मी या कारखान्यावरचा सर्व कर्ज फेडलं आहे. मात्र पुढील काळात कारखाना असा चालू ठेवण्यासाठी कर्ज घ्यावे लागेल. हे सगळं शेतकऱ्यांसाठी मी करत आहे."