Manoj Jarange Patil : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन, शेतकऱ्यांशी साधला संवाद
Beed News : राजस्तरीय किसान कृषी प्रदर्शनाचे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला.
बीड : बीडच्या (Beed) गेवराई शहरांमध्ये किसान कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या हस्ते करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मागील अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान मराठा आंदोलनाचा लढा यशस्वी झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना घोषित केलं होतं. त्यातच आता त्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे देखील उद्घाटन केले.
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी तिथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांवर भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, शेतकऱ्यांची देखील अवस्था खूप बिकट आहे. त्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे आत्महत्येचं प्रमाण देखील वाढलं आहे. आरक्षणाच्या प्रश्न मार्गी लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घालणार आहोत.
बळीराजासाठी मैदानात उतरणार
मनोज जरांगे यांच्यासोबत एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली होती. त्यावेळी 'शेतीविषयक सगळ्याच नेत्यांची उदासीनता आहे, मी माझ्या डोळ्याने बघतोय. शेतकऱ्यांचे प्रचंड वाईट हाल आहेत. मराठवाड्यात आणि विशेषता खानदेशात या नेत्यांना पाणी आणायला काय रोग झालाय का? शेतकऱ्यांना मदत सुद्धा वेळेवर मिळत नाही एक रुपयाचा विमा काढून ठेवलाय, तो काय कामाचा नाही. शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आज या अस्मानी संकटामुळे शेतकरी बेजार झाला आहे, फाशी घ्यायला लागलाय शेतकऱ्यांना तुम्हाला आडवं केल्याशिवाय पर्याय नाही. आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणार'', असं जरांगे यांनी म्हटलं होतं.
मग सरकारला वेळ कशाला हवा - मनोज जरांगे
शासन दरबारी मराठा कुणबी असल्याच्या नोंदणी सापडल्या आहेत. त्यामुळे सरकारने आता जास्तीचा वेळ न घेता तात्काळ आरक्षणासंदर्भातला निर्णय घेतला पाहिजे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात बोलताना ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या 1967 पूर्वीच्या असल्याचे मान्य केलंय. ज्यांच्या नोंदी आढळले आहेत त्यांच्या रक्ताच्या नात्यातील लोकांना सरकार आरक्षण देण्यासाठी काय निकष लावणार आहेत. याबात सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. मुंबईला जाण्यासाठी आम्हाला कोणाचेही बंधन नाही, समाज जो निर्णय घेईल त्याप्रमाणे आम्ही पुढचं आंदोलन करु. असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.