"तुला माझा नवरा खूप आवडतो का?" म्हणत गावातील महिलेला पाजले विष; पोलिसांत गुन्हा दाखल
Beed News : याप्रकरणी तिघांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Beed Crime News : बीड जिल्ह्यात (Beed District) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका महिलेस मारहाण करत विषारी द्रव्य पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'तुला माझा नवरा खूप आवडतो का? तू कशाला त्याला बोलती, असे म्हणत ही मारहाण करण्यात आल्याचं तक्रारदार महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी तिघांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एका 26 वर्षीय महिलेनं पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या 8 जून रोजी सकाळी त्या आणि त्यांची नणंद विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. याचवेळी त्यांच्याच तांड्यातील कविता जाधव आणि सुनीता जाधव या दोघी तिथे कपडे धूत होत्या. या दरम्यान कविता जाधव हिचा पती दत्ता जाधव हा तिथे बैलांना पाणी पाजण्यासाठी आला. त्यावेळी कविताने माझ्या नवऱ्याला का बघते? तुला माझा नवरा आवडतो का? असे म्हणत फिर्यादी महिलेला शिवीगाळ केली. तसेच, कवितासोबत असलेल्या सुनीता जाधव हिनेदेखील मारहाण करत तक्रारदार महिलेचे पाय धरले. तर कवितानं हात धरत तिला खाली पाडले. यावेळी दत्ता जाधव याने विषारी द्रव्य पीडित महिलेच्या तोंडात टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिने प्रतिकार केल्यानं औषध तोंडात गेले नाही. तरीही काही द्रव तोंडात गेल्यानं काही काळासाठी तक्रारदार महिला बेशुद्ध पडली होती.
तिघांवर गुन्हा दाखल...
फिर्यादी महिलेला मारहाण केल्यावर दत्ता जाधव याने विषारी द्रव पीडित महिलेच्या तोंडात टाकण्याचा प्रयत्न केला. काही द्रव्य तोंडात गेल्याने त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर गावातीलच इतर लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सविता जाधव, कविता जाधव आणि दत्ता जाधव या तिघांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हुंड्यासाठी घरातून हाकलून दिले...
दुसऱ्या एका घटनेत, 'तुला मुलगी झाली' असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. एवढेच नव्हे तर जेसीबीचा हप्ता भरण्यासाठी 10 लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत विवाहितेला चिमुकल्या मुलीसह घराबाहेर हाकलले. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बीड शहरातील मुलीचा बुलढाणा जिल्ह्यातील तरुणासोबत 2010 साली विवाह झाला होता. त्याचवेळी सर्व मानपान व हुंडा दिला होता.
त्यानंतर त्यांना 2012 साली एक मुलगी झाली. परंतु नंतर सासूने आणि पतीने तुला मुलगी झाली, असे म्हणत तिचा छळ सुरू केला. तसेच जेसीबीचा हप्ता भरण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत तिला मारहाण करण्यात आली. माहेरच्या मंडळींनी वारंवार समजावून सांगितल्यानंतरही त्यांनी ऐकले नाही. तिला घराबाहेर काढल्यानंतर पतीने दुसऱ्या महिलेसोबत संसार थाटला. याबाबत विचारणार करताच विवाहितेलाच शिवीगाळ करण्यात आली. मागील महिन्यातही विवाहितेला मारहाण करण्यात आली. अखेर हा सर्व त्रास असह्य झाल्याने विवाहितेने बीडचे शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :