Beed News : युवा सेनेच्या मराठवाडा सचिवावर भर चौकात प्राणघातक हल्ला; बीड जिल्ह्यात उडाली खळबळ
Beed News : हा हल्ला वैयक्तिक कारणातून झाला की राजकारणातून? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहे.
Beed News : बीड (Beed) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, युवा सेनेच्या मराठवाडा सचिवावर भर चौकात प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कारमधून घराकडे निघालेल्या युवासेनेचे सहसचिव (ठाकरे गट) तथा मराठवाडा सचिव असलेल्या विपुल पिंगळे यांच्यावर हा हल्ला झाला आहे. अचानक आलेल्या पाच ते सहा जणांनी पिंगळे यांच्यावर हा प्राणघातक हल्ला केला. ही घटना रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली आहे. तर या हल्ल्यात पिंगळे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे हा हल्ला वैयक्तिक कारणातून झाला की राजकारणातून? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहे.
रविवारी सायंकाळी पिंगळे हे आपल्या कारमधून घरी जात होते. मात्र, बीड शहरातील साठे चौकापासूनच त्यांच्या गाडीचा एका पांढऱ्या रंगाच्या गाडीने पाठलाग सुरु केला. सारखे हॉर्न वाजवत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न सुरु होता. विशेष म्हणजे एकवेळा बसस्थानकासमोर त्यांना धक्का देण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, वाहतूक जास्त असल्याने पिंगळे यांनी गाडी उभी केली नाही. तर पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून घराकडे वळताच पाठीमागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या गाडीतील पाच ते सहा जणांनी त्यांची गाडी अडवली. गाडी अडवून पिंगळे यांचे चालक अविनाश पवार याला सुरवातीला मारहाण करण्यात आली. त्यानंतर डाव्या बाजूला बसलेल्या विपुल पिंगळे यांनाही बाहेर ओढत मारहाण केली. याच हल्लेखोरांमधील एकाने पिंगळे यांच्या डोक्यात पाठीमागील बाजूने दगड मारला. त्यामुळे ते रक्तबंबाळ झाले.
पिंगळे यांच्यावर भर चौकात हल्ला झाल्याने काही वेळेत लोक जमा झाल्यानंतर हल्लेखोर पुन्हा त्याच पांढऱ्या रंगाच्या गाडीतून बसून बशिरगंज भागाच्या दिशेने सुसाट वेगाने निघून गेले. त्यानंतर जखमी पिंगळे यांना चालकासह इतरांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक 5 मध्ये उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. तर पोलिसांकडून जबाब घेतला जात होता.
कोण आहेत विपुल पिंगळे ?
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून बाळासाहेब पिंगळे यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांनी पक्षात विस्तारक म्हणून काम पाहिले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांना बढती देत बीडसह छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांसाठी सचिव करण्यात आले होते. मागील काही वर्षात पिंगळे यांनी युवकांना पक्षात जोडण्याचे काम केले होते. राजकारणात सक्रिय असल्याने ते कायम चर्चेत असतात.
इतर महत्वाच्या बातम्या:
दिवसा रेकी, रात्री चोरीचा कार्यक्रम; परभणीच्या 'भोसले गँग'ला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या