Beed Rain : बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर, शेतीपिकांचं मोठं नुकसान
Marathwada Rain : सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र आहे.
बीड : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने कहर केला असून कापूस, सोयाबीन, बाजरी यासह अन्य भाजीपाला पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. बीड जिल्ह्यामध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस बरसात होता. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसानं काही काळ खंड दिला. मात्र आता परतीचा मान्सून बीड जिल्ह्यात चांगलाच बरसत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे.
तीन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्यातल्या सहा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कापूस आणि सोयाबीनचे पीक वाया गेलं आहे. यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून शेतकऱ्यांना जास्त उत्पन्नाची अपेक्षा होती, मात्र परतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठ नुकसान केल तर कापसाच्या ही वाती झाल्या आहेत.
या सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद
(1) मांजरसुबा महसूल मंडळ 78.8 टक्के , (2) नेकनूर 78.8 टक्के, (3) गेवराई 66 टक्के, (4) किट्टी आडगाव 66.8 टक्के, (5) मदळमोही 66 टक्के (6) धर्मापुरी 66.8 टक्के. या सहा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली असून 594.3 मिलिमीटर इतका पाऊस पडायला हवा होता मात्र आतापर्यंत बीड जिल्ह्यात 709.6 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे.
बीड जिल्ह्यात 21 सप्टेंबर नंतर झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे मदत मिळावी म्हणून तक्रारी केल्या होत्या. आणि त्यानंतर विमा कंपनीने शेतावर जाऊन पंचनामा करणं आवश्यक होतं. मात्र अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे पिकाचा नुकसान झालेले शेतकरी आता भरपाईची मागणी करत आहेत.
परभणीत पिकांचं मोठं नुकसान
परभणीत परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने काढणीला आलेलं सोयाबीन पूर्णपणे पाण्यात गेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सेलू तालुक्यातील वालूर, रायपूर, कुपटा या परिसरात पावसाचा जोर जास्त असल्यानं स्थानिक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळं तत्काळ पिक विमा आणि मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :