Baramati News : बारामतीतील विद्यार्थ्यांचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात; दिवाळीच्या तोंडावर 10 लाख 21 हजारांची आर्थिक मदत
Baramati News : बारामतीतील विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी 10 लाख वर्गणी जमा केली आणि ती सुपूर्त देखील केली. बारामतीतील ज्ञानसागर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी घरोघरी जाऊन मदत गोळा केली

Baramati News : बारामतीतील विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी (Flood Victims) 10 लाख वर्गणी जमा केली आणि ती सुपूर्त देखील केली. बारामतीतील ज्ञानसागर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी घरोघरी जाऊन मदत गोळा केली आणि ती पूरग्रस्तांसाठी सरकारच्या हवाली केलीय. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना 10 लाख 21 हजारांची आर्थिक मदत केली आहे. या मदतीमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे.
पूरग्रस्त परिस्थितीमुळे हजारो शेतकरी हतबल झाले होते. यावेळी शिवार फाऊंडेशनला 5 लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ दिले आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 5 लाख 21 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. यामुळे महापुराच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भर दिवाळीच्या तोंडावर ज्ञानसागर गुरुकुलच्या माध्यमातून 10 लाख 21 हजार रुपयांची आर्थिक मदत करुन विद्यार्थांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. सोबतच बळीराज्याच्या पाठीशी आम्ही सगळे सोबत आहोत असा एक आदर्श महाराष्ट्र समोर ठेवला आहे.
Beed News : अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वळता करू नका, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
शेतकऱ्यांना प्राप्त झालेली अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वळता करू नये, अथवा बँक खाते होल्ड करू नये, असे स्पष्ट निर्देश बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. बीड जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई म्हणून प्रशासनाकडे 577 कोटी 78 लाख रुपयांचा निधी प्राप्त झालाय. आणि हेच अनुदान शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मिळण्यासाठी प्रशासनाकडून ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. शेतकऱ्यांकडे फार्मर तसेच ॲग्रीस्टॅक आयडी असल्यास ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही. मात्र शेतकऱ्यांकडे हा आयडी नसल्यास सीएससी सेंटरमधून ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. याबाबतची यादी गावनिहाय्य प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना तक्रार असल्यास 1077 या टोल फ्री क्रमांक नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन देखील करण्यात आले. शेतकऱ्यांना ही रक्कम प्राप्त झाल्यास बँकांनी अनुदान कर्ज खात्यात वळता करू नये, अथवा शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड करू नये असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत.
Chandrapur : कालव्यात पडलेल्या नातवाला वाचवताना आजोबाही गेले वाहून
कालव्यात पडलेल्या नातवाला वाचवताना आजोबाही वाहून गेल्याची दुःखद घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सावली तालुक्यातील हिरापूर येथील ही घटना असून रोहित गोरंतवार आणि भगवानदास लाटेलवार असं वाहून गेलेल्या नातू आणि आजोबांचं नाव आहे. काल हे दोघं बकऱ्यांचा चारा आणण्यासाठी आसोलामेंढा तलावाच्या परिसरात गेले होते. झाडावर चढून पाला तोडताना नातवाचा तोल गेला आणि तो आसोलामेंढा च्या कालव्यात पडला. हे पाहताच आजोबाने नातवाला वाचवण्यासाठी कालव्यात उडी घेतली मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. सध्या या दोघांचाही शोध सुरू असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.























