Washim News: आई-वडिलांनी मृत समजलं, पण बिहारचा जयपाल वाशिममध्ये तीन महिन्यांनी जिवंत सापडला; मुलाचा चेहरा दिसताच कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू, नेमकं काय घडलं?
Washim News: तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेला बिहार राज्यातील एक तरुण वाशिम जिल्ह्यातील मानोरा वनपरीक्षेत्रात जिवंत सापडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Washim News: तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेला बिहार (Bihar) राज्यातील एक तरुण वाशिम जिल्ह्यातील मानोरा वनपरीक्षेत्रात जिवंत अवस्थेत सापडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जयपाल नावाचा हा तरुण आपल्या घरच्यांच्या नजरेआड गेल्यानंतर कुटुंबियांनी त्याचा मृत्यू झाला असावा असे गृहीत धरले होते. मात्र, अखेर तो वनक्षेत्रात सलीम अन्सारी या व्यक्तीला आढळल्याने त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा किरण उजळला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मानोरा वनपरीक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान जंगलात एक तरुण भटकंती करताना आढळला. संशय आल्याने त्यांनी त्याच्याशी संवाद साधला असता त्याने आपले नाव जयपाल असल्याचे सांगितले. पुढील चौकशीत त्याच्याबाबत अधिक माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे आणले असता कर्तव्यावर हजर असलेले पोलीस शिपाई विजय गंगावणे यांनी त्याची मानसिक स्थिती समजून घेतली. त्याच्या अस्पष्ट बोलण्यातून गावाचे नाव समजले. फक्त गावाच्या नावावरून गुगल मॅप च्या सहाय्याने तेथील पान शॉप या बोर्ड वरील मोबाईल क्रमांकावर कॉल करून बस्ती समारा गावातील व्यक्तीचा मोबाईल क्रमांक मिळवला. बिहार राज्यातील बजरंग चौक, जिल्हा बत्तीसअमरा येथील त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला.
Washim News: कुटुंबीयांना अश्रू अनावर
यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्याचे आई-वडिलांशी बोलण्याची सोय केली. स्क्रीनवर आपल्या मुलाला जिवंत पाहताच कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्यांनी भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. तीन महिन्यांपासून मृत्यू समजलेल्या मुलाला जिवंत पाहताच संपूर्ण कुटुंब भारावून गेले.
Washim News: जयपाल बिहारला रवाना
दरम्यान, जयपाल या तरुणाला कारंजा येथील स्थानिक नागरिक सलमान मेमन यांनी पोलीस निरीक्षक शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विजय गंगावणे याच्या सहकार्याने आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून सुरक्षितपणे बिहारला रवाना केले. या हृदयस्पर्शी घटनेमुळे मानोरा परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले असून, पोलीस विभाग आणि स्थानिक नागरिक याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video
इतर महत्त्वाच्या बातम्या
























