Tesla चे सीईओ Elon Musk यांची कर्मचाऱ्यांना धमकी, ऑफिस या किंवा नोकरी सोडा
टेस्लामधील कर्मचाऱ्यांना किमान 40 तास कार्यालयात येऊन काम करावे लागणार आहे. ज्यांनाही हे अमान्य असेल त्यांनी नोकरी सोडली तरी काही मला काही हरकत राहणार नसल्याचे टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क म्हणाले.
Elon Musk : इलेक्ट्रिक कार निर्माती करणारी कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकी दिली आहे. प्रत्येक आठवड्याला किमान 40 तास ऑफिसमधून काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. एखाद्याने असे केले नाही तर त्याने राजीनामा दिला आहे असे गृहीत धरण्यात येईल असा दमही त्यांनी भरला.
मस्क यांनी कर्मचाऱ्यांना या संदर्भात ई-मेल पाठवले असून त्यांनी आपल्या ट्विटवरही आपण मेल केल्याचे कबूल केले आहे. एखाद्याला कंपनीचे नियम आवडत नसल्यास, तो नोकरी सोडू शकतो, असा इशाराही मस्क यांनी दिला आहे. टेस्ला ही कंपनी वाहन निर्मिती क्षेत्रात असून ही निर्मिती फोन वर शक्य नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
या श्रेणीमध्ये वर्क फ्रॉम होमची सुविधा कर्मचाऱ्यांना देणाऱ्या कंपन्यांना त्यांनी धारेवर धरले. या कंपन्यांनी किती उत्पादन बाजारात सादर केले आहे. याचा विचार उदाहरण देण्यापूर्वी करावा असेही त्यांनी खडसावले आहे. एखादा कर्मचारी दर आठवड्याला 40 तास ऑफिसमधून काम करु शकत नसल्यास, त्याने राजीनामा दिल्याचे गृहीत धरण्यात येणार असल्याचे मस्क यांनी सांगितले. मी स्वतः दररोज कारखान्यात खूप वेळ घावलतो. कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करत कामाचा आढावा घेतो. त्यामुळेच टेस्ला कंपनी या स्थितीत आहे. मी असे करणे बंद केले तर कंपनीला दिवाळखोरीत निघायला वेळ लागणार नसल्याचेही यावेळी ते म्हणाले.
'मेड इन चायना'ला नकार
टेस्लाला भारतात कार विकायच्या असतील तर भारतात कारखाना सुरू करावा लागेल, असं भारत सरकारनं स्पष्ट केलं आहे. त्यासाठी टेस्ला भारत सरकारच्या पीएलआय योजनेचा लाभ घेऊ शकते. चीनमध्ये बनवलेल्या टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात विकल्या जाणार नाहीत, असं भारतानं स्पष्ट केलं आहे.
टेस्लाचे भारताला आवाहन
भारतातील आयात शुल्क कमी करण्याबाबतचा टेस्ला आणि सरकार यांच्यातील करार बऱ्याच दिवसांपासून रखडला आहे. या वाटाघाटीवर सुमारे एका वर्षाहून अधिक काळापासून बोलणी सुरु आहेत. मस्क यांची इच्छा आहे की, सरकारने भारतात टेस्लाचा कारखाना सुरू करण्यापूर्वी त्यांनी बनवलेल्या इलेक्ट्रिक कार भारतात आणण्यावर आयात करातून सूट द्यावी. यामुळे टेस्लाला भारतीय बाजारपेठेतील त्यांच्या कारची मागणी आणि प्रतिसाद तपासता येईल.