Odysse E-Scooter: मुंबईच्या कंपनीने लॉन्च केली जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किती देणार रेंज
Odysse E-Scooter: मुंबईमधील स्टार्टअप ओडिसीने भारतीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ट्रॉट सादर केली आहे.
Odysse E-Scooter: मुंबईमधील (Mumbai) स्टार्टअप ओडिसीने भारतीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) ट्रॉट सादर केली आहे. कंपनीने ही एका खास वर्गासाठी बनवली आहे. ही अत्यंत टिकाऊ स्कूटर असून या बाइकची लोडिंग क्षमता 250 किलो आहे. . या वाहनाचे सरासरी मायलेज 75 किमी आहे आणि ही आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) कनेक्टेड असल्याने हे वाहन ट्रॅक करणे, इम्मोबिलायझेशन (गाडी बंद करणे), जिओ-फेन्सिंग आणि इतर आधुनिक फीचर्सने सुसज्ज आहेत.
Odysse E-Scooter: एका चार्जमध्ये गाठणार 75 किमी
ट्रॉटमध्ये 250 वॅटची इलेक्ट्रिक मोटर (electric scooter) आहे. या वाहनाचा कमाल वेग 25 किमी/प्रति तास इतका आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पुढील बाजूस ड्रम ब्रेक आहे आणि मागील बाजूस डिस्क-ब्रेक आहे. चार्जिंग सुलभ करण्यासाठी कंपनीने या वाहनात 60V 32Ah क्षमतेची काढता येणारी (डिटॅचेबल) वॉटरप्रूफ बॅटरी लावलेली आहे. ही बॅटरी 2 तासांत 60% चार्ज होते आणि संपूर्ण चार्ज व्हायला 4 तास लागतात. एका चार्जमध्ये ही गाडी 75 किमी अंतर जाते. 60V32AH IP67 बॅटरी पॅकमुळे अतुलनीय टिकाऊपणा प्राप्त होतो आणि बी2बी वापरासाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरते.
ट्रॉटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि फीचर्स आहेत. डिलिव्हरी क्षेत्राच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी ते कस्टमाइझ करता येऊ शकतात. डिलिव्हरीच्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ट्रॉट डिझाइन करण्यात आली आहे. गॅस सिलिंडर, अवजड हार्डवेअर उपकरणे, पाण्याची पिंपे या सर्वांपासून ते किराणा सामान, औषधे इत्यादी दैनंदिन वापराच्या वस्तूंपर्यंत ही उत्पादने अखंडितपणे व सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी ओडिसीतर्फे अतिरिक्त कस्टमाइझ्ड अॅक्सेसरी उपलब्ध करून देण्यात येतात.
ही इलेक्ट्रिक स्कूटर (electric scooter) चार रंगांमध्ये उपलब्ध आहे - पिवळा, काळा, लाल आणि मरून. या इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये ट्रेंडी लूक्स आणि भक्कम बांधणीची सांगड घालण्यात आली आहे. रायडरसाठी आरामदायीपणाची खातरजमा करण्यासाठी ट्रॉटमध्ये स्मार्ट बीएमएस, IoT ट्रॅकिंग डिव्हाइस, एलडी ओडोमीटर इत्यादी फीचर्स समाविष्ट केले आहेत.
स्कूटरच्या लॉन्चिंग प्रसंगी ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्स प्रा. लि.चे सीईओ नेमिन व्होरा म्हणाले, "कोव्हिड-19 महासाथीने ई-कॉमर्स आणि लास्ट माइल डिलिव्हरी (घरपोच डिलिव्हरी) या दोन क्षेत्रांच्या वाढीला चालना दिली. सातत्याने नवीन प्रयोग करणे, संचलनाचा खर्च करणे आणि कार्यक्षमता वाढविणे याला डिलिव्हरी सेगमेंटमधील व्यवसायांकडून प्राधान्य देण्यात आले. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे हा पर्यावरणस्नेही बदल आहे. जो लोकांना व कंपन्यांना स्वीकारायचा आहे. या स्कूटरच्या निमित्ताने आम्ही बी2बी सेगमेंटमध्ये पदार्पण केले असून ही अशा प्रकारची एकमेव स्कूटर असून ती मार्केटमध्ये उलथापालथ घडवून आणणार आहे.''