Toyota Land Cruiser: पॉवरफुल इंजिन... जबरदस्त ऑफरोडिंग फीचर्स; टोयोटाची नवी Land Cruiser SUV सीरिज लॉन्च
Toyota Land Cruiser तिच्या पॉवरफुल इंजिन आणि उत्कृष्ट ऑफरोडिंग क्षमतेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. सुमारे 72 वर्षांपूर्वी, 1 ऑगस्ट 1951 रोजी, कंपनीने लँड क्रूझर सीरिज प्रथमच जगासमोर आणली. आता पुन्हा एकदा ही SUV नव्या स्टाईलमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
Toyota Land Cruiser: जपानी ऑटोमेकर टोयोटानं अखेर आज आपली बहुप्रतिक्षित लँड क्रूझर (Land Cruiser) एसयूव्ही सीरिज लॉन्च केली आहे. कंपनीनं एक नव्हे तर दोन लँड क्रूझर लॉन्च केल्या आहेत. एक लँड क्रूझर 250 आहे, जी आकारानं लहान आहे आणि उत्तर अमेरिकन बाजारपेठेसाठी लॉन्च करण्यात आली आहे. दुसरं मॉडेल हेव्ही-अपडेटेड रेट्रोल-स्टाईल लँड क्रूझर 70 आहे, जी ग्लोबल मार्केटमध्ये 'Land Cruiser Prado' म्हणून विकली जाईल. विशेष म्हणजे, टोयोटाच्या पॉवरफुल एसयूव्हीचा बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान देखील फॅन आहे आणि त्याच्या कार कलेक्शनमध्ये लँड क्रूझर 300 आहे.
का खास आहे लँड क्रूझर?
साधारणतः 72 वर्षांपूर्वी 1 ऑगस्ट 1951 रोजी लँड क्रूझर सीरिज जगासमोर आली होती. लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही काळातच ही SUV जगभरात प्रसिद्ध झाली आणि माउंट फुजीच्या सहाव्या स्थानकावर पोहोचणारी पहिली कार बनली. माउंट फुजी, ज्याला फुजी यम म्हणून देखील ओळखलं जातं, हा जपानमधील एक ज्वालामुखी आहे, जो जपानमधील सर्वात उंच पर्वत देखील आहे. हा 10 वेगवेगळ्या स्थानकांमध्ये विभागलेला आहे. जगभरातील 170 देशांमध्ये सुमारे 11.3 दशलक्ष युनिट्सच्या विक्रीसह लँड क्रूझर SUV लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
टोयोटानं काही वर्षांपूर्वी नॉर्थ अमेरिकन बाजारपेठेत लँड क्रूझर 200 डिस्कंटीन्यू केली होती. आता हा ब्रँड पुन्हा एकदा लँड क्रूझर 250 सह USA मध्ये परत आला आहे. दरम्यान, टोयोटा भारतीय बाजारपेठेत लँड क्रूझर 300 विकते, परंतु, ही एसयूव्ही टोयोटानं कधीही उत्तर अमेरिकन बाजारपेठेत लॉन्च केली नव्हती.
नव्या कोऱ्या Land Cruiser Prado ची वैशिष्ट्य
लँड क्रूझरच्या गौरवशाली इतिहासाबद्दल प्रत्येकालाच माहिती आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते Land Cruiser Prado ची वाट पाहत होते. नव्या कोऱ्या मॉडेलबद्दल बोलायचं झालं तर, Toyota Land Cruiser Prado ला जवळपास 14 वर्षांनंतर एक मोठं अपडेट मिळालं आहे, कंपनीनं SUV ची मोड्युलर TNGA-F आर्किटेक्चरवर आधारित सुधारणा केली आहे. नुकतीच सादर केलेली Lexus GX SUV देखील याच प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. हे डिझाइन लँड क्रूझर्सच्या जवळपास सर्व मागील जनरेशनकडून प्रेरित केलं गेलं आहे, या SUV मध्ये टू-बॉक्स सिल्हूट देण्यात आला आहे, जो ही SUV किती दणकट आहे, याची साक्ष देतो.
लक्झरी ड्रायव्हिंगसह ऑफरोडिंगच्या बाबतीत ही एसयूव्ही जगभरात प्रसिद्ध आहे. लँड क्रूझर प्राडोचं नवं मॉडेल पूर्णपणे आधुनिक ऑफरोडिंग तंत्रज्ञानावर आधारित असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. त्याच्या चेसिसबद्दल, कंपनीचा दावा आहे की, ते मागील मॉडेलपेक्षा 50 टक्के मजबूत आहे आणि पूर्ण बॉडी-ऑन-फ्रेम असेंबली सुमारे 30 टक्के मजबूत आहे. आकाराच्या बाबतीत, या SUV ची लांबी 4,920 मिमी, उंची 1,870 मिमी आणि 2,850 मिमीचा व्हीलबेस आहे. मागील मॉडेलच्या तुलनेत ते आकारानं थोडं मोठं आहे आणि त्याचं एक्सटीरियर आणि इंटीरियर पुन्हा डिझाइन केलं गेलं आहे.
इंडिरियर
SUV च्या आतील बाजूस, लँड क्रूझर 300 सह सामायिक केलेल्या बर्याच स्विचगियरसह चंकी फिजिकल कंट्रोल मिळतात. यात मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, प्लश लेदर अपहोल्स्ट्री आणि रॅपराउंड डिजिटल डिस्प्लेसह लेटेस्ट जेनरेशनची इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. कंपनीनं आपली केबिन अॅडव्हान्स करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही.
Land Cruiser 70 ची वैशिष्ट्य
टोयोटाने आपलं नवी लँड क्रूझर 70 देखील कॉस्मेटिक बदलांसह अपडेट केलं आहे. SUV आधीच ऑस्ट्रेलिया, मध्य पूर्व आणि आफ्रिका सारख्या बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. यात फारसे बदल करण्यात आलेले नाहीत, परंतु नवीन राउंड शेप हेडलॅम्प, नवीन ग्रिल डिझाइन आणि नवीन टोयोटा बॅजिंगसह पूर्णपणे नवीन फ्रंट स्टाइल मिळते. पारंपारिक पेट्रोल इंजिनाऐवजी, नवीन 70 मालिका 2.8-लिटर 1GD टर्बो डिझेल इंजिन पॉवरट्रेनसह येतं, ज्याबाबत कंपनीचा दावा आहे की, ते शक्तिशाली असून कमी आवाज करतं. हे इंजिन 204 PS पॉवर आणि 500 Nm टॉर्क जनरेट करते.
नवी लँड क्रूझर भारतात लाँच होणार?
भारतात नवीन लँड क्रूझर लॉन्च होणार की, नाही? याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. लँड क्रूझर 70 बद्दल काहीही सांगता येत नसलं तरी भारतीय ग्राहक लँड क्रूझर प्राडोची नक्कीच अपेक्षा करू शकतात. कंपनीनं मागील ऑटो एक्स्पो दरम्यान लँड क्रूझर 300 देखील सादर केली होती आणि ती विक्रीसाठी देखील उपलब्ध आहे. त्यामुळे नवी कोरी Land Cruiser Prado लवकरच भारतीयांच्या भेटीसाठी येईल, अशी शक्यता आहे.