Hydrogen Bus: भारताची पहिली हायड्रोजन बस होतेय सुरू; पेट्रोल-डिझेलची गरज नाही, फक्त हवा आणि पाण्यावर होणार काम
First Hydrogen Fuel Cell Bus Service in India: भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस सोमवारपासून सुरू होत आहे.
India's First Hydrogen Bus: ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने भारत एक महत्त्वाचं पाऊल टाकत आहे, कारण सोमवारपासून (25 सप्टेंबर) भारतातील पहिली हायड्रोजनवर (Hydrogen) चालणारी बस सेवा सरू होणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी देशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल बसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
सुरुवातीला लाँच होणार दोन बस
इंडियन ऑईलने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील विशिष्ट मार्गांवर 15 ग्रीन हायड्रोजन बस चालवण्यासाठी चाचणी घेतली. यातील दोन बसचा सेट 25 सप्टेंबर 2023 रोजी दिल्लीतील इंडिया गेट येथून लाँच करण्यात येईल. यानंतर केंद्रशासित प्रदेश लडाखच्या आणि लेहच्या रस्त्यांवरही हायड्रोजन बसची सेवा सुरू होणार आहे. हायड्रोजन फ्युएल सेल बसचा मुख्य उद्देश पर्यावरणाच्या दृष्टीने वाटचाल करण्याचा आहे. राज्यातील जास्त उंचीवरील, थंड प्रदेशातील, वाळवंटातील सार्वजनिक रस्त्यांवर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची व्यावसायिक चाचणी घेऊन तिथेही हायड्रोजन फ्युएल सेल बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.
शून्य-उत्सर्जन गतिशीलतेकडे पाऊल
इंडियन ऑईलने फरीदाबाद येथील आर अँड डी कॅम्पसमध्ये इंधन भरण्याची सुविधा देखील स्थापित केली आहे, जी सौर पीव्ही पॅनल्स वापरून इलेक्ट्रोलिसिसद्वारे उत्पादित ग्रीन हायड्रोजनचे इंधन भरण्यास सक्षम आहे. लाँच करण्यात येणाऱ्या बस एकत्रितपणे 3 लाख किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापतील. हिरव्या हायड्रोजनद्वारे भारतातील शून्य-उत्सर्जन गतिशीलतेचं भविष्य घडेल. हे महत्त्वाचं पाऊल शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल वाहतूक उपायांसाठी भारतासाठी महत्त्वाचं आहे.
हायड्रोजन बस प्रवासासाठी किती खर्च येणार?
हायड्रोजन फ्युएल सेल बसमधील प्रवासाचा खर्च सध्या वापरात असलेल्या 9-मीटर डिझेल बसच्या बरोबरीचा असेल. पहिल्या स्वातंत्र्यमहोत्सवी वर्षात ही सेवा सुरू करण्याची योजना होती, मात्र पूर आणि भूस्खलनामुळे पहिली बस लेहला उशिरा पोहोचली, त्यामुळे या सेवेचं अद्याप उद्घाटन झालेलं नाही.
कार्बन उत्सर्जन रोखण्याचा प्रयत्न
हायड्रोजन बस चालवण्यासाठी फ्यूल सेल हायड्रोजन आणि वायूचा वापर करून वीजनिर्मिती केली जाते आणि या वाहनांमधून केवळ पाणी बाहेर पडतं. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की, हायड्रोजन बेस्ड वाहनं ही पर्यावरणास सर्वात अनुकूल अशी वाहनं आहेत. लांबचा प्रवास करणारी कोणतीही डिझेलवर चालणारी बस दर वर्षाला 100 टन कार्बनचं उत्सर्जन करते. भारतात अशा 10 लाखांहून अधिक बस चालवल्या जात आहेत, त्यामुळे पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी हायड्रोजन बस निर्मितीला देशात प्रोत्साहन दिलं जात आहे.
हेही वाचा:
Volkswagen Cars: नवीन फॉक्सवॅगन टिगुआन कारचा लूक समोर; जाणून घ्या दमदार फिचर्स