Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar on Rohit Pawar : शरद पवार यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेतून त्यांनी मोठे संकेत दिले आहेत.
Sharad Pawar on Rohit Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Assembly Election 2024) प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात (Karjat Jamkhed Vidhan Sabha Constituency) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून शरद पवार यांनी महायुतीचे (Mahayuti) उमेदवार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार टीका केली. तसेच शरद पवार यांच्याकडून रोहित पवारांच्या मंत्रिपदाचे संकेतही देण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कर्जत जामखेडमधील सभेत शरद पवार म्हणाले की, देशात 31 आमचे खासदार तुम्ही निवडून दिले आणि मोदींना काहीही करता आलं नाही. विधानसभा निवडणूक आली आणि त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. या देशात महिलांना सुरक्षा देणं अधिक गरजेचं आहे. महायुतीच्या काळात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. राज्यात मागील 2 वर्षात 67 हजार 381 महिलांनी आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार दिली आहे. तर 64 हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत, अशी आकडेवारी मांडत शरद पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
शरद पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल
ते पुढे म्हणाले की, कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामाकडे रोहित पवारांचे लक्ष आहे. या तालुक्याला 10 वर्ष एक आमदार होता, मंत्री होता, सत्ता हातात होती त्यांनी काय केलं 10 वर्ष? असे म्हणत शरद पवार यांनी राम शिंदे यांच्यावर टीका केली. मी मागे चौंडीत आलो, तिथे एक टोलेजंग बंगला बांधण्यात आलाय. मी विचार केला की, हा भाग तर दुष्काळी भाग आहे, तर हा बंगला कुणाचा असा प्रश्न मला पडला, असं म्हणत शरद पवारांकडून राम शिंदे यांच्या चौंडीतील घरावरून निशाणा साधला.
शरद पवारांकडून रोहित पवारांच्या मंत्रिपदाचे संकेत
मी पहिल्यांदा आमदार झालो. तेव्हा माझ्याकडे कोणतेही पद नव्हते. पण दुसऱ्या वर्षी मी राज्यमंत्री ते मुख्यमंत्री झालो. रोहितचे पहिले वर्ष संपले आहे, आता त्याचे दुसरे वर्ष आहे, असं म्हणत शरद पवार यांच्याकडून रोहित पवारांच्या मंत्रिपदाचे संकेत देण्यात आले. 20 तारीख ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. राज्याचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा त्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, असे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले.
आणखी वाचा