कार चोरीला गेली अन् 'लॉक' बनविण्याची कंपनीच निर्माण केली; अहमदनगरच्या पठ्ठ्याची कमाल
अहमदनगरच्या(Ahmednagar) सावेडी परिसरात राहणाऱ्या विलास घोडके यांचं चारचाकी घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं. पण पै-पै जमा करून खरेदी केलेली चारचाकी रात्रीतून चोरट्यांनी लंपास केली.
Ahmednagar News Update: एखादं घर, एखादी चारचाकी असावी असं प्रत्येक सर्वसमान्यांचं स्वप्न असतं. अशाच पद्धतीने 29 वर्ष खासगी कारखान्यात काम करून अहमदनगरच्या(Ahmednagar) सावेडी परिसरात राहणाऱ्या विलास घोडके यांचं चारचाकी घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं. पण पै-पै जमा करून खरेदी केलेली चारचाकी रात्रीतून चोरट्यांनी लंपास केली. शोध घेऊनही चारचाकी न मिळाल्याने विलास घोडके यांनी थेट 'लॉक' निर्मितीचा कारखानाच सुरू केला.
... अन् सुचली कार लॉक तयार करण्याची कल्पना
सावेडीच्या अहिल्यानगरीत राहणारे विलास घोडके यांची ही कहाणी. अहमदनगरच्या एमआयडीसीत एका खासगी कंपनीत काम करून मोठ्या कष्टाने त्यांनी चाचकी खरेदी केली. पण 2015 साली घरासमोरील पार्किंगमधून त्यांची कार चोरीला गेली. सर्वसामान्यांची कार चोरी गेल्यानंतर जशी स्थिती होती तशीच त्यांचीही झाली होती. कार चोरीला गेल्यानंतर विलास घोडके यांनी पोलिसात तक्रार दिली. शोधाशोध केली पण कार काही मिळून आली नाही. दुःख आणि तेवढ्याच रागातून घोडके यांना कार लॉक तयार करण्याची आयडियाची कल्पना सुचली.
15 लाख रुपये भागभांडवल गुंतवून लॉक तयार करण्याचा कारखाना
विलास घोडके यांना एक सुरक्षित लॉक तयार करण्याची कल्पना त्यांना सुचली. त्यासाठी छोट्या छोट्या साहित्याची जमवाजमव त्यांनी केली. निवृत्ती वेतनातून मिळालेले 15 लाख रुपये भाग भांडवल गुंतवून लॉक तयार करण्याचा कारखाना त्यांनी सुरू केला आणि निर्माण झालं फॉर सेक्युअर लॉक. त्यांच्या कारखान्यात दररोज शंभरहून अधिक लॉक तयार केले जातात. या लॉकचे पेटंट रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांनी अनेकांना हे लॉक दिले. विशेष म्हणजे आपल्या कारमध्ये कोणताही बदल न करता हे लॉक लावता येतं. याची किंमत ही 1500 ते 2100 रुपये एवढी आहे.
लोक लाखो रुपयांच्या कार खरेदी करतात, पण सुरक्षेबाबत त्यांच्या मनात नेहमीच धाकधूक राहते. यावरच अगदी कमी दरात सुरक्षेचा उपाय घोडके यांनी बनवला आहे. या लॉकची मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याचं देखील घोडके यांनी सांगितलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या