(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray Aurangabad Rally : राज ठाकरे यांच्या सभेचं काय होणार?
Raj Thackeray Aurangabad Rally : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का या प्रश्नाच्या उत्तराबद्दल पोलिसांनी अजूनही सस्पेन्स ठेवला आहे.
औरंगाबाद : राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी मनसे पदाधिकाऱ्यांनी स्टेज उभारण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे औरंगाबाद पोलीस आयुक्तांची राज्याच्या गृहमंत्र्यांसोबत आज झालेल्या बैठकीमध्ये परवानगीबाबत विचारणा केल्याचं समजतं. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का या प्रश्नाच्या उत्तराबद्दल पोलिसांनी अजूनही सस्पेन्स ठेवला आहे.
राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी पोलिसांनी परवानगी देण्याबाबत अजूनही मौन बाळगलं आहे. अर्ज करुन सहा दिवस झाले असले तरी पोलिसांनी परवानगीबाबत अद्यापही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे मनसे पदाधिकारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा घेण्यावर ठाम आहेत. त्यांनी स्टेजची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांनी परवानगीबाबत निर्णय तरी घेतला नसला तरी देखील भाजप मात्र परवानगी दिली पाहिजे या भूमिकेत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल तर आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी देखील सभेला परवानगी दिली पाहिजे, असं मत व्यक्त करत वरिष्ठांनी सांगितलं तर सभेला हजर देखील मिळेल असं म्हटलं.
मनसे येत्या काही दिवसात राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेचा टीझर लॉन्च करणार आहे. असं असलं तरी अद्यापही पोलीस राज ठाकरे यांच्या सभेसाठी परवानगी द्यायला तयार नाहीत. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार आज औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत या विषयावर चर्चा झाली. मात्र निर्णय झाला नसल्याचं समजतं. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेचं काय होणार या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तरीत आहे.
संबंधित बातम्या