(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray Rally : औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणाऱ्या सभेचं स्थळ मनसे बदलणार?
Raj Thackeray Rally : मराठवाडा सांस्कृतिक मैदानाऐवजी सिडको परिसरात असलेल्या गरवारे स्टेडियममध्ये सभेसाठी परवानगी देण्याची तयारी पोलिसांनी दर्शवली आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये 1 मे रोजी सभा घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर मनसैनिक जोरदार तयारी करत आहेत. मात्र मराठवाडा सांस्कृतिक मैदानात सभेसाठी आग्रही असलेल्या मनसेला आपलं सभा स्थळ बदलावं लागण्याची शक्यता आहे. कारण या मैदानाऐवजी पोलिसांनी मनसेला गरवारे स्टेडियमचा पर्याय दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठवाडा सांस्कृतिक मैदानाऐवजी सिडको परिसरात असलेल्या गरवारे स्टेडियममध्ये सभेसाठी परवानगी देण्याची तयारी पोलिसांनी दर्शवली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच दरवाजा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनसेच्या सभेला विरोध वाढत आहे. त्यामुळे मनसेच्या या सभेला गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडला तर लोकांना त्रास होईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
औरंगाबादमध्ये 1 मे रोजी मनसेची सभा होणार आहे. या सभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. परंतु त्यांच्या सभेला वंचित बहुजन आघाडीसह अनेक संघटनांनी विरोध केला आहे. राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र या संघटनांनी पोलीस आयुक्तांना पाठवलं आहे. त्यात पोलिसांनी अद्यापही मनसेच्या सभेला परवानगी दिलेली नाही. शिवाय आता सभेचं स्थळ बदलण्याचा सल्लाही दिला आहे.
अनेक संघटनांचा मनसेच्या सभेला विरोध
एकीकडे मनसेने राज ठाकरेंच्या सभेसाठी तयारी सुरु केली असताना दुसरीकडे विरोध केला जात आहे. सध्याची परिस्थिती, रमाजानचा महिना आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा असे विविध विषय उपस्थित करत अनेक संघटना दररोज पोलीस आयुक्तांना भेटून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये अशी निवेदनं दिली जात आहेत आहे. काल (19 एप्रिल) दिवसभरात पाच संघटनांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारावी असं निवेदन दिलं.
कोणत्या पक्ष संघटनांचा राज ठाकरेंच्या सभेला विरोध?
1. वंचित बहुजन आघाडी .
2. प्रहार संघटना
3. मौलांना आझाद विचार मंच
4. गब्बर ॲक्शन संघटना
5.ऑल इंडिया पँथर सेना
मनसेच्या सभेला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
तर मनसेने पोलीस आयुक्त कार्यालयात राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळावी यासाठी निवेदन दिलं. यावर पोलीस आयुक्त, दोन पोलीस उपायुक्त आणि सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या परिसरातील पोलीस निरीक्षक यांची बैठक झाली. त्यात राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 2011 मध्ये मनसेचे तत्कालीन आमदार हर्षवर्धन जाधव यांना झालेल्या मारहाणीविरोधात राज ठाकरेंनी सभा घेतली होती. परंतु पोलिसांनी मनसेला ताटकळत ठेवत सभेच्या चार तास आधी परवानगी दिली होती. आता राज ठाकरेंच्या 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी पोलीस अशीच रणनीती आखणार असल्याची चर्चा आहे.
औरंगाबाद इथल्या वादग्रस्त सभेचे विषय आणि पोलीस परवानगीचा इतिहास
1. 5 जानेवारी 2011 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा वेरुळ लेणीचा दौरा होता. त्यावेळी मनसेचे तत्कालीन आमदार हर्षवर्धन जाधव निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात घुसले आणि पोलिसांसोबत अरेरावी केली, असा आरोप करत पोलिसांनी जाधव यांना मारहाण केली होती. पोलिसांनी आपल्या आमदाराला अमानुष मारहाण केली असं म्हणत राज ठाकरे यांनी 12 जानेवारी 2011 रोजी मराठवाडा संस्कृतिक मैदानावर सभा घेतली. या सभेला परवानगीसाठी पोलिसांनी मनसेला ताटकळत ठेवलं होतं. सभेच्या काही तास आधी परवानगी दिली होती.
2. हिजाब गर्ल मुस्कान हिचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 14 मार्चला औरंगाबादेतील आमखास मैदानावर सत्कार ठेवला होता. पोलिसांनी 13 तारखेला रात्री परवानगी नाकारली. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने कोर्टात धाव घेतली मात्र त्याचा फायदा झाला नाही.