Aurangabad: शिवसेना मंत्र्याच्या मतदारसंघात पाणी प्रश्न पेटला; मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी राष्ट्रवादीच आंदोलन
पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादीकडून आज भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
Paithan Water Issues: औरंगाबाद शहरातील पाणीप्रश्न गंभीर बनला असताना आता ग्रामीण भागात सुद्धा पाणी टंचाईचे चटके जाणवत आहे. अशीच काही परस्थिती रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ असलेल्या पैठणमध्ये पाहायला मिळत आहे. नागरिकांना आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याची परिस्थिती आहे. तर दुसरीकडे याच पाण्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादीकडून आज आंदोलन करण्यात येणार आहे.
मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण ज्या पैठण शहरात आहेत, तिथेच पाणी टंचाई जाणवत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे धरणात मुबलक असा पाणीसाठा असतानाही प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वासामन्य पैठणकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर याच पैठण तालुक्याचे आमदार संदीपान भुमरे हे ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहे. मात्र असे असताना सुद्धा पैठणचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.
उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मोर्चा...
औरंगाबाद शहरातील पाणी टंचाईचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन पोहचला आहे. खुद्द मुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यातच उद्धव ठाकरेंची औरंगाबाद शहरात होणाऱ्या सभेला दोन दिवस शिल्लक राहिले असताना, आता ग्रामीण भागातील पाणी टंचाईचा मुद्दाही समोर आला आहे. तर ठाकरेंच्या सभेपूर्वी राष्ट्रवादीकडून आंदोलन केले जात असल्याने पाणी प्रश्नावरून राजकीय वातावरण आणखीच तापणार आहे.
पाण्यावरून राजकीय रणकंदन...
पैठण नगरपालिकेचा कार्यकाळ संपल्याने याठिकाणचा कारभार सद्या प्रशासकाच्या खांद्यावर आहे. प्रशासक लागण्यापूर्वी नगरपालिकेत नगराध्यक्ष भाजपचा होता. तर बालेकिल्ला शिवसेनेचा आहे. पण आतापर्यंत नगरपालिकेच्या इतिहासात कधी नव्हे पाहायला मिळालेल्या पाणी प्रश्नावरून राजकीय रणकंदन पाहायला मिळत आहे. शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी पक्षातील सर्व माजी नगरसेवक एकमेकांवर आरोप करण्याची संधी सोडत नाहीत. त्यामुळे औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून सुरु असलेला राजकीय वाद आता ग्रामीण भागात सुद्धा पाहायला मिळत आहे.
यामुळे पाणी टंचाई...
गोदावरी काठावर असलेला आणि जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पैठण शहराला पाण्याची कमतरता नाही. बाजूलाच धरण असून थेट धरणातून पाईपलाईन केलेली आहे. मात्र शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा जुनी झाली असल्याने पूर्णपणे खराब झाली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेला 20 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यामुळे पाईप फुटणे, पाणी पुरवठा वारंवार खंडीत होणे अशा घटना सतत घडत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचे पाहायला मिळत आहे.