पक्षातील नेत्याच्या जाचास कंटाळून तालुकाध्यक्षाचा आत्महत्येचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंना पत्रही लिहलं
Beed News: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अक्षय भूमकर यांच्यावर अंबाजोगाईच्या रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Beed News: ठाकरे गटातील नेत्याच्या जाचास कंटाळून एका तरुण कार्यकर्त्याने आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बीडच्या अंबाजोगाईत समोर आली आहे. युवा सेनेचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अक्षय भूमकर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकाचे नाव असून, मराठवाडा युवा सेना विभागप्रमुख विपुल पिंगळे यांच्यासोबतच्या आर्थिक व्यवहाराच्या (Financial Transactions) जाचास कंटाळून आत्महत्या करत असल्याचा पत्र भूमकर याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना लिहले आहे. तर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अक्षय भूमकर यांच्यावर अंबाजोगाईच्या रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहे.
आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी फेसबुकवर केली पोस्ट....
याबाबत अक्षय भूमकर याने सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटले आहे की, युवासेना मराठवाडा विभागीय सचिव विपुल बाळासाहेब पिंगळे यांच्या जाचास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. वारंवार खोट बोलुन, खोटे आश्वासन देऊन आज आत्महत्या करण्यास जाणीवपूर्वक मला प्रवृत्त करण्यात आले आहे. गेल्या आठ-पंधरा दिवसांपासून मी हे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु माणुसकी व विश्वासाखातीर हे करण्याचे टाळत होतो. परंतु आज ती वेळ शेवटी आलीच. मला वाटले होते की, विपुल पिंगळे आमच्यात ठरलेल्या व्यवहार दिलेल्या शब्दानुसार संपवतील,पण तसे झाले नाही. पिंगळे यांना मी आजपर्यंत समजावून घेतले, पण मला त्यांनी समजूनच घेतले नसल्याने मला नाईलाजास्तव हे पाऊल उचलावे लागत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या सोबतच्या अनेक दिवसांपासूनच्या स्नेही संबंध भेट आठवणीला आज पुर्ण विराम लागतोय, अशी पोस्ट करत भूमकर यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
काय आहे प्रकरण
युवा सेनेचे विभागीय सचिव असलेल्या विपुल पिंगळे यांची पिंगळे कंट्रक्शन नावाची कंपनी असून याच कंपनी अंतर्गत तालुका अध्यक्ष असलेल्या अक्षय भुमकर यांने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील ग्रंथालयाच्या संरक्षण भिंतीच काम केलं होतं. हे काम करण्यासाठी अक्षय भुमकर याने व्याजाने पैसे काढून काम पूर्ण केलं. मात्र आता पिंगळे कंट्रक्शन कंपनीकडे कामाचे पैसे जमा होऊनही अक्षय भूमकर याला पैसे देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर विपुल पिंगळे यांनी पैसे न दिल्याने अक्षय भुमकर याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पत्र लिहीत आत्महत्येचा प्रयत्न केला. तर विपुल पिंगळे यांच्यासोबत व्यवहारात झालेल्या त्रासाबद्दल आत्महत्या करत असल्याचे अक्षय यांनी पत्रात नमूद केले आहे.
रक्ताने लिहले होते पत्र...
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अक्षय भूमकर याने शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांना थेट रक्ताने पत्र लिहलं होतं. ज्यात 'शिवसेना व शिवसैनिकांच्या जिवावर जे मोठे झाले, आमदार-खासदार अशी अनेक पदे मिळविली त्यांनीच शिवसेना सोडली. मात्र, आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या आशयाचे पत्र अक्षय भूमकर यांनी स्वतःच्या रक्ताची शाई करून उद्धव ठाकरे यांना प्रतिज्ञापत्र लिहिले होते.