(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: 'उथळरावांनी' शिक्षक-पदवीधर आमदारांवर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघाचा विकास करावा; सतीश चव्हाणांचा बंब यांना टोला
Aurangabad : शिक्षक आणि पदवीधर आमदारांवर बोलण्यापेक्षा 'उथळरावांनी' आधी आपल्या मतदारसंघाचा विकास करावा असा खोचक टोला चव्हाण यांनी बंब यांना लगावला आहे.
Aurangabad News: शिक्षकांच्या मुख्यालयी रहाण्याचा मुद्दा उपस्थित करणारे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी आता राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ सुद्धा बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर राज्यभरातील शिक्षक आणि पदवीधर आमदारांकडून बंब यांच्यावर टीका केली जात आहे. त्यातच राष्ट्रवादीचे मराठवाडा पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी सुद्धा बंब यांना खरमरीत पत्र लिहून उत्तर दिले आहे. शिक्षक आणि पदवीधर आमदारांवर बोलण्यापेक्षा 'उथळरावांनी' आधी आपल्या मतदारसंघाचा विकास करावा असा खोचक टोला चव्हाण यांनी बंब यांना लगावला आहे.
सतीश चव्हाण यांनी बंब यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, आमदार प्रशांत बंब यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेमधील शिक्षक मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याचे सांगत त्यांच्यावर रोष व्यक्त केला होता. आता त्यांनी शिक्षक व पदवीधर आमदार या शिक्षकांना पाठीशी घालतात त्यामुळे शिक्षक व पदवीधर मतदारसंघच बंद केले पाहिजे अशी बातमी एका वृत्त वाहिनीवर पाहिली.खरे तर बंब यांची मागणी अत्यंत हास्यास्पद आहे.
मुख्यालयी राहण्याचा एवढा अट्टहास कशासाठी?
शिक्षकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी हजर राहण्याची मागणी बंब करत आहेत. परंतु मुख्यालयी राहण्यासाठी त्या शिक्षकांना राहण्या योग्य घरे आणि सोयीसुविधा आहेत का? याचा विचार बंब यांनी करायला हवा. तर शिक्षक हे वेळेवर शाळेत येत असतील व विद्यार्थ्यांना ते गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतील तर आमदार बंब यांचा शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचा एवढा अट्टहास कशासाठी? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
अन्यथा आमदार बंब यांनी गुणवत्तेबद्दल गप्पा झोडू नयेत...
कोरोना काळात डॉक्टर, पोलीस यांच्याबरोबरच शिक्षकांनी देखील स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम केलं असल्याचं कादाचित आमदार महोदय विसरले असावेत. त्यामुळे आमदार महोदयांनी पहिल्यांदा आपल्या सरकारला शिक्षकांवर लादलेली अध्यापन बाह्य कामे पूर्णत: बंद करायला सांगावीत. तसेच जिल्हा परिषद शाळांना पूर्ण पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास भाग पाडावे आणि मग शैक्षणिक गुणवत्तेबद्दल गप्पा झोडाव्यात, असा टोला चव्हाण यांनी लगावला.
पदवीधरांचे प्रश्न मांडायला आम्ही समर्थ आहोत
तर आमदार बंब यांना माझी विनंती आहे की, जि.प.च्या शाळेत शिकलेले विद्यार्थी आज कुठे आहेत? याचा त्यांनी एखाद्या खाजगी संस्थेकडून सर्वे करून घ्यावा. अभिमान वाटेल अशा ठिकाणी जि.प.शाळेत शिकलेले विद्यार्थी अग्रेसर असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आता प्रशांत बंब यांना शिक्षक, पदवीधर मतदारसंघ कालबाह्य वाटायला लागले आहेत. उद्या वरिष्ठ सभागृह असणारे विधान परिषद ही नको वाटेल. त्यामुळे अशा 'उथळरावांनी' शिक्षक व पदवीधर आमदारांवर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल याकडे लक्ष द्यावे. शिक्षक, पदवीधरांचे प्रश्न मांडायला आम्ही समर्थ आहोत,असा खोचक टोला चव्हाण यांनी बंब यांना लगावला आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI